मैथिली - लोकसंगीतापासून राजकारणापर्यंतचा तेजस्वी प्रवास

लोकसंगीतातील सुरेल प्रवासातून राजकारणाच्या व्यासपीठावरील आश्वासक आवाज याचा प्रेरणादायी मागोवा.

Update: 2025-11-18 06:18 GMT

पार्श्वभूमी आणि संगीतातील वाटचाल

मैथिली ठाकूरचा जन्म २५ जुलै २००० ला बिहारमधील बेनीपट्टी, मधुबनी जिल्ह्यात झाला. तिला बालपणापासूनच गायनाची आवड होती. तिचे वडील आणि आजोबा यांनी तिला भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत याचे शिक्षण दिले. त्यासोबतच ती हार्मोनियम, तबला आणि इतर अनेक वाद्यात पारंगत आहे. तिने इंडियन आयडॉल जुनियर, सारेगमप लिटिल चॅम्प्स, रायजिंग स्टार अश्या सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये भाग घेऊन लहानपणीच संगीत क्षेत्रातील आपल्या प्रवासाला सुरुवात केली. संगीताच्या माध्यमातून तिने लोकांमध्ये लोकप्रियता मिळवली. तिच्या युट्युब चॅनलला देखील खूप प्रसिद्धी मिळाली.

पुरस्कार आणि सन्मान

२०२१ मध्ये तिला बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारही प्राप्त झाला. फेसबुक आणि युट्युबवरील मोठ्या यशानंतर ती आपल्या २ भावांसह (ऋषव आणि अयाची) विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, लिटरेचर फेस्टमध्ये सहभागी होऊ लागली. मैथिलीला भारत सरकारने 'अटल मिथिला' सन्मान प्रदान केला आहे. इ.स. २०१९ मध्ये मैथिली आणि तिचे दोन भाऊ निवडणूक आयोगाचे मधुबनीचे ब्रँड अॅम्बेसेडर बनले होते.

राजकारणात प्रवेश आणि विजय

२०२५ मध्ये मैथिली ठाकूरने भारतीय जनता पक्ष (BJP) मध्ये प्रवेश केला आणि तिला दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदार संघात उमेदवारी मिळाली. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत ती बहुमताने विजयी झाली. तिने RJD चे जेष्ठ उमेदवार बिनोद मिश्रा यांना साधारण १११,७३० मतांनी पराभूत करून ती बिहारची सर्वात युवा विधायक बनली आहे.

राजकीय उद्दिष्टे आणि आश्वासने

मैथिली ठाकूरने आपल्या प्रचारामध्ये काही महत्वाची वचने दिली आहेत. त्यातील एक महत्वाचे वचन म्हणजे अलीनगरचे नाव बदलून सीतानगर ठेवणे. तिने शालेय अभ्यासक्रमात मिथिला पेंटिंगचाही समावेश करण्याची योजना मांडली आहे. तसेच मुलींच्या शिक्षणासाठी आणि तरुणांच्या रोजगारासाठी देखील प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.

भविष्यवेधी राजकीय प्रवास

मैथिलीचे युवा व्यक्तित्व जनतेसाठी राजकारणातील एक आश्वासक चेहरा म्हणून पुढे येत आहे. मैथिलीचा राजकीय प्रवास नव्यानेच सुरु झाला असला तरी तिच्यातील प्रामाणिकता आणि तरुण उत्साह तिला इतरांपासून वेगळं बनवतो. तिने योग्य पावले उचलून लोकांच्या अपेक्षांशी प्रामाणिक राहिल्यास लवकरच ती गाण्याप्रमाणे राजकारणमध्येही लोकप्रियता मिळवेल हे नक्की.

Tags:    

Similar News