अजित पवारांचा फक्त पुरुष संपादकांशी संवाद, पण निमंत्रितांमध्ये 'ती' नाहीच.
६ जानेवारी, 'मराठी पत्रकार दिन'. याच औचित्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील प्रमुख मराठी, हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांच्या संपादकांची आणि ज्येष्ठ पत्रकारांची सदिच्छा भेट घेतली. पुण्यातील सर्किट हाऊस येथे झालेल्या या बैठकीत पवारांनी सर्व पत्रकार बांधवांशी सुसंवाद साधला आणि त्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, या सदिच्छा भेटीच्या अधिकृत फोटोंमध्ये आणि उपस्थितीमध्ये एकही महिला पत्रकार किंवा महिला संपादक दिसली नाही, ही बाब आता चर्चेचा विषय ठरत आहे.
नेमकी बातमी काय? दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीनिमित्त साजरा होणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून अजित पवार यांनी पुण्यातील माध्यम क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या समस्या, शहराचे प्रश्न आणि माध्यम क्षेत्रातील बदलत्या आव्हानांवर चर्चा केली. अजित पवारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या भेटीचे फोटो शेअर करत, "सर्व पत्रकार बांधवांना मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि सुसंवाद साधला," असे नमूद केले.
एकही महिला पत्रकार नसल्याने उपस्थित झाले प्रश्न: या कार्यक्रमाचे जे फोटो समोर आले आहेत, त्यामध्ये सर्वच्या सर्व पुरुष संपादक आणि पत्रकार दिसत आहेत. आजच्या काळात पत्रकारितेच्या प्रत्येक क्षेत्रात—मग ते राजकीय असो, क्राईम असो की शहर प्रशासन—महिला पत्रकारांचा दबदबा मोठा आहे. पुण्यासारख्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक माहेरघरात अनेक वृत्तपत्रांच्या जबाबदार पदांवर महिला कार्यरत आहेत. असे असताना, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सदिच्छा भेटीत एकही महिला चेहरा न दिसणे, हे खरोखरच धक्कादायक मानले जात आहे.
महिला सक्षमीकरणाच्या आणि 'लाडकी बहीण' योजनेच्या गप्पा मारणाऱ्या सरकारमधील एका बड्या नेत्याच्या बैठकीत महिला पत्रकारांना डावलले गेले की निमंत्रणच दिले गेले नाही? असा प्रश्न आता सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. पत्रकारितेसारख्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात 'स्त्री-पुरुष समानता' केवळ कागदावरच राहिली आहे का, अशी उपरोधिक टीकाही यानिमित्ताने होत आहे.