पूजा जाधव यांची माघार! ही हार नक्की कुणाची?

सोशल मीडिया ट्रोलिंगमुळे पूजा जाधव यांची निवडणुकीतून माघार!

Update: 2026-01-02 11:50 GMT

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या एकाच विषयाची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे भाजपच्या अधिकृत उमेदवार पूजा धनंजय जाधव यांनी घेतलेली अनपेक्षित माघार. प्रभाग क्रमांक २ (फुलेनगर-नागपूर चाळ) मधून उमेदवारी जाहीर झालेल्या पूजा जाधव यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, एका अधिकृत उमेदवाराला अशा प्रकारे रडत माघार घ्यावी लागणे, ही लोकशाहीसाठी आणि पक्षासाठी नक्की कुणाची हार आहे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

पूजा जाधव यांना भाजपने उमेदवारी जाहीर करताच सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर मोहीम चालू झाली. त्यांचे जुने व्हिडिओ, जुन्या पोस्ट आणि त्यांच्या राजकीय प्रवासातील काही विधाने प्रचंड व्हायरल करून त्यांना लक्ष्य करण्यात आले. या ट्रोलिंगचा दबाव इतका वाढला की, अखेर पूजा जाधव यांना पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडताना अश्रू अनावर झाले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "मी राजकीय षडयंत्राची आणि सोशल मीडियावरील चारित्र्यहननाची बळी ठरले आहे."

त्यांना ट्रोल करण्यामागे प्रामुख्याने असणाऱ्या मुडद्यांवर त्यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केले. सर्वात मोठा वाद हा काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबतच्या त्यांच्या विधानावरून निर्माण झाला. सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला की, पूजा जाधव यांनी या हल्ल्यातील गांभीर्य नाकारले किंवा तिथे धर्माच्या आधारावर हल्ले होत नसल्याचे सांगून आरोपींची पाठराखण केली. यावरून त्यांना "हिंदूविरोधी" ठरवून प्रचंड ट्रोल केले गेले. यावर आपली बाजू मांडताना त्या म्हणाल्या की, "पहलगामचा हल्ला हा हिंदूंवर झालेला हल्लाच होता आणि आम्ही तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व हिंदूंना आणि पर्यटकांना मदत केली."

त्यांच्या विरोधातील दुसरा मोठा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांवरील त्यांची जुनी टीका. मराठा आरक्षण चळवळीच्या काळात पूजा जाधव (मोरे) यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या धोरणांवर कडाडून टीका केली होती. त्यावेळचे काही आक्रमक व्हिडिओ पुन्हा समोर आले, ज्यावरून भाजप समर्थकांनीच "ज्या नेत्यावर कालपर्यंत टीका केली, त्यांच्याच नावावर मते कशी मागता?" असा सवाल उपस्थित केला. यावर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या की, "मराठा आरक्षण चळवळ ही समाजाच्या भावनेची होती आणि देवेंद्र फडणवीस यांचे या विषयात मोठे योगदान आहे. मात्र, आरक्षण मागतो बायको नाही हे चुकीच वक्तव्य माझ्या तोंडात घातलं. या गोष्टी मॅार्फ करून चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर नेल्या जात आहेत.

त्यांनी भावूक होत उत्तर दिले की, "मी शेतकरी चळवळीतून आलेली मुलगी आहे आणि शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं आहे. राजकारणात एका महिलेला काम करताना किती अडचणी येतात, हे मला ठाऊक आहे. माझा संघर्ष कुणीही पाहिला नाही, फक्त माझ्या चुकांवर बोट ठेवले गेले."

पूजा जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेताना जो टाहो फोडला, तो राजकारणातील एका विदारक वास्तवाकडे बोट दाखवतो. ज्या उमेदवाराची निवड पक्षाने सर्व निकष तपासून केली होती, त्या उमेदवाराला ट्रोलिंगसमोर वाचवण्यात पक्ष कुठेतरी कमी पडला का? हा प्रश्न आता चर्चिला जात आहे. ही माघार केवळ एका उमेदवाराची नाही, तर ती सोशल मीडियाच्या त्या "भीतीदायक" ताकदीचे उदाहरण आहे, जिथे कोणत्याही पुराव्याशिवाय एखाद्याची राजकीय कारकीर्द धोक्यात आणली जाऊ शकते. हे त्यांचे शब्द आगामी निवडणुकीत नक्कीच चर्चेचा विषय ठरतील.

Tags:    

Similar News