अंडी गोठवा पण करियर करा... का म्हणाल्या त्या असं?
उपासना कामिनेनी यांच्या सल्ल्यावरून निर्माण झालेली चर्चा; ‘करिअर-लग्न’ संतुलनावर महिलांचे प्रश्न उपस्थित
उपासना कामिनेनी कोनिडेला यांनी अलीकडे केलेल्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. करिअरला प्राधान्य देण्याचा आणि अंडे गोठवण्याचा (Egg Freezing) सल्ला त्यांनी तरुण महिलांना दिल्यानंतर अनेक नेटिझन्सनी त्यांच्या मतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
उपासना कामिनेनी कोण आहेत?
उपासना कामिनेनी कोनिडेला या अपोलो हॉस्पिटल्सच्या कार्यकारी उपाध्यक्षा प्रज्ञा रेड्डी यांच्या कन्या आणि अपोलो फाउंडेशनच्या उपाध्यक्ष आहेत. उद्योग क्षेत्रातील एक तरुण आणि प्रभावशाली महिला नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्या साउथ सुपरस्टार राम चरण यांच्या पत्नी असून सामाजिक उपक्रम, हेल्थकेअर मॅनेजमेंट आणि वुमन वेलनेस या क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. सोशल मीडियावरही त्या फिटनेस, मातृत्व आणि आधुनिक महिलांसमोरील प्रश्नांवर आपली मते स्पष्टपणे मांडत असतात.
वय, लग्न आणि करिअर—वास्तव वेगळं?
उपासना आणि राम चरण यांची कॉलेजपासूनची मैत्री आणि २०१२ साली झालेलं लग्न हा अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास मानला जातो. उपासना तेव्हा २३ वर्षांच्या होत्या तर राम चरण २७ वर्षांचे. त्यामुळे त्यांनी स्वतः कमी वयात लग्न करून नंतर करिअर घडवलं असताना महिलांनी आधी करिअरला प्राधान्य द्यावं असा सल्ला देण्यात विसंगती असल्याचं काही महिलांचं मत आहे.
एग-फ्रीझिंग म्हणजे हमी योजना नाही
“एग फ्रीझिंगला विमा मानू नये,” असं अनेक तज्ञांचे म्हणणे आहे. वाढत्या वयासोबत शरीरातील अनेक आरोग्यसंबंधी घटक गर्भधारणा आणि आरोग्यदायी प्रसूतीवर परिणाम करतात. त्यामुळे केवळ अंडे गोठवल्याने गर्भधारणेचं यशस्वी प्रमाण वाढतं, ही धारणा वास्तवापेक्षा वेगळी असल्याचेही सोशल मीडियावरील चर्चेतून स्पष्ट होत आहे.
करिअर—आरोग्य—नातेसंबंध : काय प्राधान्य?
उपासना यांनी “Wealth, Health, Relationship” असा प्राधान्यक्रम सुचवल्यानंतर अनेक महिलांनी विरोध दर्शवला. करिअर वाढवण्याच्या धावपळीत आरोग्य आणि नातेसंबंध यांच्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे जीवनातील नातेसंबंध मागे ढकलण्याचा सल्ला देणे हे संतुलित नाही, अशी भूमिका मांडली जात आहे.
सरासरी महिलांची स्थिती वेगळी
“उपासना ही सामान्य महिला नाही. तिच्या जीवनाच्या, आर्थिक स्थैर्याच्या आणि सामाजिक स्थानाच्या आधारावर दिलेला सल्ला सर्वांवर लागू पडत नाही,” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येत आहेत. करिअरची लक्ष्यं निरंतर बदलत असतात; पण नातेसंबंध आणि मातृत्व यांना मात्र मर्यादित जैविक वेळ असल्याचे अनेकांचे मत आहे.
करिअर आणि लग्न परस्परविरोधी नाहीत
महिलांनी करिअर आणि नातेसंबंध दोन्ही एकत्र सांभाळावेत, वैयक्तिक आयुष्य पुढे ढकलू नये, दोघांनीही एकत्रित ध्येयं ठरवून जगावं—असा संतुलित सल्ला देण्याची अपेक्षा उपासनांकडून काही जणांनी व्यक्त केली.