जे आव्हाडांना जमलं ते संजय राऊतांना का करता आलं नाही?

Update: 2021-12-09 11:32 GMT

बिग फॅट वेडींग अर्थात खर्चिक लग्नं हा भारतात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. लग्नांमधील खर्चाच्या दबावामुळे अनेक परिवार उद्ध्वस्त झाले आहेत, अनेक आत्महत्या झाल्या आहेत. मोठ्या तालेवार लोकांच्या लग्नांमधील रोषणाई-झगमगाट बघून अनेक गरीब मुलं-मली त्यांच्या मात्या-पित्यांचे आयुष्य बरबाद झाले आहेत. विदर्भातील अनेक शेतकरी आत्महत्यांच्या मागे मुलींची लग्न हा विषय असल्याचं ही समोर आलं आहे.

अशा परिस्थितीत ज्यांना लोकं आपला नेता मानतात त्यांच्याकडून आदर्शांची अपेक्षा ही लोकांना असते. लग्न हा तसा वैयक्तिक विषय आहे. त्यावर कोणी किती खर्च करावा हा ज्याचा त्याचा विषय असं म्हणून या विषयाची चर्चा थांबवता येता नाही. काही दिवसांच्या अंतराने झालेली दोन लग्न त्याचमुळे चर्चेचा विषय बनतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचं घरीच रजिस्ट्रारच्या उपस्थितीत लग्न झालं. हे आंतरधर्मीय लग्न होतं, मुलाच्या धर्माप्रमाणे नंतर ख्रिश्चन पद्धतीने ही लग्न केलं जाणार आहे. तर दुसरी कडे शिवसेना नेते संजय राऊतांच्या मुलीचं पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न झालं. हळद-लग्न-रिसेप्शन असा एकूण सोहळा नेत्रदीपक होता.

दोन नेत्यांच्या मुलींची ही दोन लग्नं, नवदाम्पत्यांना आमच्या मनापासून शुभेच्छा असल्या तरी ही यातल्या सामाजिक संदेशाची चर्चा ही सार्वजनिक मंचावरून केली पाहिजे ही गरज आम्हाला नाकारता आली नाही. मोठमोठ्या खर्चिक लग्नांचं प्रेशर समाजावर पडत असतं. यातून बाहेर पडून काही संकेत रूढ करण्याची गरज आहे. हल्ली लग्न साधेपणाने आणि नंतर रिसेप्शन जोरदार करण्याची ही पद्धत आहे. अनेकदा काही लोकं सामाजिक संदेशाची ही चोरी करतात. मुलीचं लग्न साधेपणाने लावून द्यायचं आणि मुलाकडच्यांनी रिसेप्शन जोरदार केलं असं सांगायचं, असा रिसेप्शन मध्ये बिचाऱ्या मुलाकडेच्या लोकांना साधं स्थान ही असत नाही ही गोष्ट वेगळी. तर असा संदेश ही काही कामाचा नाही. लग्न एकदाच केलं जातं, त्यात अनेकांच्या भेटी गाठी होतात, आपल्या मनमरातबाला साजेसं लग्न केलं तर चुकलं कुठे वगैरे वगैरे जुनीच प्रश्नावली आहेच, ती असणारच आहे. मात्र त्याला साधंसं उत्तर आहे की साधेपणातही मानमरातब राखला जाऊ शकतो. फक्त आपण या समाजाचं देणं लागतो हे मनापासून स्विकारलं पाहिजे.

Full View

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मुलीचं अगदी घरगुती, साधेपणाने लग्न करून समाजाचं देणं फेडण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊतांना ही हे करता आलं असतं. लग्नावरचा खर्च हा तुमचा वैयक्तिक विषय असला तरी त्यातला सामाजिक संदेश हा सार्वजनिक विषय आहे. त्यामुळे आपणही असा खर्च करण्याचा विचार करत असाल तर स्वतःला दुरूस्त करून घ्या. 


Tags:    

Similar News