अजित दादांना बोलू न देणं ही भाजपची संकुचित मनोवृत्ती, रूपाली चाकणकर यांची टीका...

Update: 2022-06-15 10:25 GMT

मंगळवारी देहुत संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी न दिल्याने भाजपवर टीका केली जात आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीही टीका करत दादांना बोलू न देणं ही भाजपची संकुचित मनोवृत्ती असल्याचं म्हटलं आहे.

मंगळवारी १४ जुन ला देहु येथे संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. या वेळी झालेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर देहु संस्थानाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाषणासाठी निमंत्रीत केलं पण त्यांच्या शेजारी बसलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलावलं नाही. पंतप्रधानांनी मग स्वतः अजित पवारांना भाषणाची विनंती केली परंतू अजित पवारांनी नकार दिला. य़ा सर्व घटनेनंतर देहु संस्थानावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी तर अजित दादांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीही ट्विट करत भाजपवर टीका केली आहे.

त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, "मागील काही वर्षांपूर्वी झालेल्या पुणे मनपाच्या कार्यक्रमात साहेबांना निमंत्रण नसणे आणि आज #देहू येथील कार्यक्रमात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री मा. अजित पवार दादांना बोलू न देणे ही भाजपच्या संकुचित मनोवृत्तीचं लक्षण आहे. राज्य अथवा केंद्र सरकार मध्ये अति महत्वाच्या व्यक्तींना दिला जाणारा मान यासाठी राज शिष्टाचार नावाचं खाते आपल्याकडे आहे.त्या राजशिष्टाचारांच्या नियमांना पायदळी तुडवण्याचे काम भाजप सरकार वेळोवेळी करत आले आहे."

देहु संस्थानाच्या या मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिलं जातं पण राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी दिली जात नाही. त्यामुळे देहु संस्थान कोणा एका पक्षाला झुकतं माप देतं का असे प्रश्न देखील आता विचारले जात आहेत.

Tags:    

Similar News