"मी तुमचं धोतर खेचलं तर कसं वाटेल?"
नितीश कुमारांच्या 'त्या' कृतीवर राखी सावंतचा संताप
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात महिला डॉक्टरचा हिजाब (नकाब) ओढल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका होत असतानाच, आता अभिनेत्री राखी सावंत हिनेही संताप व्यक्त केला आहे. राखीने थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत त्यांना जाहीर माफी मागण्याचे आव्हान दिले आहे.
नेमकं प्रकरण काय?
पाटणा येथे आयुष डॉक्टरांना नियुक्ती पत्र वाटपाचा सोहळा सुरू होता. यावेळी एका मुस्लिम महिला डॉक्टरला सन्मानित करण्यासाठी मंचावर बोलावण्यात आले होते. तिने हिजाब परिधान केला होता. व्हायरल व्हिडिओनुसार, नितीश कुमार यांनी अचानक त्या महिलेचा हिजाब ओढून तिचा चेहरा उघड करण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारामुळे ती महिला डॉक्टर काही काळ गोंधळलेली आणि अस्वस्थ दिसली.
राखीची तिखट प्रतिक्रिया
नेहमीच वादात राहणाऱ्या राखी सावंतने यावेळी अत्यंत गंभीर विषयावर आपली मतं मांडली आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ती म्हणते:
"नितीश जी, मी तुमची मोठी फॅन आहे, तुमचा आदर करते. पण हे तुम्ही काय केलंत? एका मुस्लिम महिलेचा बुरखा ओढणं ही किती शरमेची गोष्ट आहे. तुम्हाला धर्माबद्दल आणि महिलांच्या आदराबद्दल पाच पैशांचं तरी ज्ञान आहे का?"
इतक्यावरच न थांबता राखीने पुढे एक खळबळजनक विधान केले. ती म्हणाली, "नितीश जी, जर मी भर बाजारात तुमचं धोतर ओढलं किंवा पायजम्याचा नाडा खेचला तर तुम्हाला कसं वाटेल? एका बाजूला तुम्ही महिलांचा सन्मान करण्याच्या गप्पा मारता आणि दुसरीकडे अशा प्रकारे त्यांची अब्रू काढता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे."
'यूपीचे मुख्यमंत्री' म्हणत केली चूक
राखीने जरी नितीश कुमारांवर हल्लाबोल केला असला, तरी नेहमीप्रमाणे तिची एक चूक ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. संताप व्यक्त करताना तिने नितीश कुमारांचा उल्लेख 'यूपीचे मुख्यमंत्री' असा केला. बिहारचे मुख्यमंत्री असताना त्यांना युपीचे म्हटल्यामुळे नेटकऱ्यांनी राखीला तिचं 'जनरल नॉलेज' सुधारण्याचा सल्लाही दिला आहे.
विरोधाची धार तीव्र
केवळ राखीच नव्हे, तर माजी अभिनेत्री सना खान हिनेही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विरोधकांनी या घटनेला महिलांच्या अस्मितेचा प्रश्न बनवले असून नितीश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.