दलित पँथर सुवर्ण महोत्सवी विशेषांकावेळी सुषमा अंधारे उपस्थित

Update: 2023-01-18 06:47 GMT

'दलित पँथर' ही दलितांची अस्मितादर्शक चळवळ तरुणाईच्या जागतिक उत्थापनाच्या पार्श्वभूमीवर जन्माला आली आणि आंबेडकरी चळवळीत नवचैतन्य निर्माण केले. या घटनेला आज पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने 'पँथर' या दलित पँथर सुवर्ण महोत्सवी विशेषांकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.

​मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात कार्यरत असलेले आंबेडकरी चित्रकार, कवी, लेखक डॉ. सुनील अभिमान अवचार यांनी 'दलित पँथर'च्या या विशेषांकाचे संपादन केले आहे. नुकतेच या विशेषांकाचे प्रकाशन मातोश्री येथे मा. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मा. सुभाष देसाई, सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कवी लेखक, दलित पँथरचे एक संस्थापक अर्जुन डांगळे, परिवर्तनाचा वाटसरूचे संपादक अभय कांता, फुले आंबेडकरी वाङमयकोशाचे संपादक डॉ. महेंद्र भवरे, ज्येष्ठ कवयित्री हिरा बनसोडे, उर्मिला पवार, प्रज्ञा पवार, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक सुनील कदम, चित्रकार प्रकाश भिसे, डॉ. विजय पट्टेबहादूर यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

​या विशेषांकामध्ये दलित पँथर चळवळीचा आढावा, पँथर्सचे स्वकथन, पँथर्स विषयी स्मरण लेख, मुलाखती, तसेच पँथर्स विषयीच्या कविता प्रकाशित केल्या आहेत. पँथरकडे जुनी पिढी, बुद्धीजीवी, आजची तरुणाई कोणत्या दृष्टीकोनातून पाहते याचाही वेध या अंकात घेण्यात आला आहे. सोबतच पँथर्सचे काही दुर्मिळ दस्तऐवज या विशेषांकातून वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.


Tags:    

Similar News