पंकजा मुंडे पोहचल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर; जयंत पाटलांचा घेतला समाचार

Update: 2021-09-28 10:45 GMT

मराठवाड्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर शेतकऱ्यांचे सुद्धा मोठं नुकसान झाले आहे. सोमवारी रात्रभर झालेल्या अतिवृष्टीनं बीड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना अशा सर्वच जिल्ह्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर परळीत झालेल्या नुकसानग्रस्त भागाची भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका सुद्धा केली.

पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, परळीच्या देशमुख टाकळी येथे आज अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली व स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी या अस्मानी संकटाचा धैर्याने सामना करावा, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची सरसकट भरपाई मिळवून देण्यासाठी मी पाठपुरावा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हंटल आहे.

जयंत पाटलांवर टीका...

तर बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर पंकजा मुंडे यांनी टीका केलीय. बीड जिल्ह्यात मोबाईल वाजला मदत आली असं शेतकऱ्यांना वाटायचं. पण आता या सरकारमध्ये कसलीच मदत नाही. कॅबिनेट मंत्र्यांचा बीड दौरा झाला. मात्र, एकाही बांधावर जात त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं नाही, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी जयंत पाटलांच्या दौऱ्यावर टीका केलीय.

Tags:    

Similar News