"ज्यांची जबाबदारी होती ते कमी पडले"

“जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या समस्या राज्याच्या नेत्या पर्यंत पोहचवणं हे स्थानिक नेत्याच काम होतं पण ते अपयशी ठरले” लाठिचार्ज प्रकरणावर पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

Update: 2021-06-18 14:00 GMT

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी बीड जिल्हाच्या दौऱ्यावर होते. यावेळी महिला कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला, असता त्यांच्यावर पोलिसांकडून लाठीचार्ज केल्या असल्याचा प्रकार समोर आला.

या प्रकरणावर आता पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रीया दिली असून त्यांनी "हा सगळा प्रकार संतापजनक आहे. ज्यांची जबाबदारी होती ते कमी पडले. स्वत:च्या जिल्ह्यात उपमुख्यमंत्री आले आहेत तर जमा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची अजित पवारांची भेट घडवून आणणं तिथल्या स्थानिक नेत्यांचं काम होतं. त्यांनी ठरवलं असतं तर गोंधळ झाला नसता. मागण्या तर पूर्ण होत नाहीत, पण किमान भेट आणि बोलू द्यायला हवं होतं. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्यांना अशाप्रकारे धक्काबुक्की आणि लाठीमार हे संतापजनक आहे. अजित पवारांकडून हे अपेक्षित नव्हतं." असं म्हटलं आहे.

दरम्यान, सरकारी नोकरीत समाविष्ट करुन घेण्याच्या मागणीसाठी शेकडो कंत्राटी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळपासून जमा झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठक संपल्यानंतर अजित पवारांचा ताफा बाहेर पडत असताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ताफा अडवला. यावेळी महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

यावेळी पोलिसांनी सुरवातीला कर्मचाऱ्यांना गाडी समोरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र गर्दी जास्त असल्याने सौम्य लाठीमार सुद्धा केला असल्याचं आरोप होत आहे.

Tags:    

Similar News