Jammu Kashmir: मेहबुबा मुफ्ती अनिश्चित काळासाठी श्रीनगरमध्ये नजरकैदेत..

Update: 2021-11-18 05:13 GMT

 जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना अनिश्चित काळासाठी घरातच नजर कैदेत ठेवण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया वाढल्यात. सुरक्षा दलाच्या जवानांनी अतिरेक्यांचं एन्काऊंटर सुरू केलं आहे. त्यावरून मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर सातत्याने टिका केली होती. त्याचबरोबर अतिरेकी आणि जवानांच्या चकमकीमध्ये दोन नागरिक मारल्या गेल्याने मृतांच्या कुटुंबीयाने निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चात सहभागी होण्यासाठी जात असताना मुफ्ती यांना रोखण्यात आलं आणि त्यांना पुढील आदेश येईपर्यंत नजर कैदेत ठेवण्यात आलं आहे.

मुफ्ती या जम्मूला गेल्या होत्या. तिकडून मागे येत असताना हैदरपोरा येथे सुरक्षा दल आणि अतिरेक्यांच्या चकमकीत ठार झालेल्या दोन नागरिकांच्या कुटुंबीयांनी निदर्शनाचे आयोजन केले होते. या निदर्शनात सहभागी होण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांना निदर्शनात सहभागी होण्यापासून मज्जाव केला. तसेच त्यांना तात्काळ नजर कैदेत ठेवण्यात आले. दरम्यान मुफ्ती यांनी गोळीबारामध्ये सामान्य नागरिक मारले गेल्याने त्याविरोधात बुधवारी निदर्शने केली. तसेच मारलेल्या नागरिकांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देण्याची देखील मागणी केली. सशस्त्र दल विशेषाधिकार अधिनियम जेव्हापासून लागू झाला आहे. तेव्हापासून निष्पाप लोकांना मारलं तरी त्यावर सरकार उत्तर देत नाही, असं मुफ्ती यांनी यावेळी म्हटले आहे. सोमवारी दहशतवाद विरोधी अभियानाच्या दरम्यान सुरक्षा दलाच्या गोळीबारात दोन नागरिकांसह चार लोक मारले गेले होते.

Tags:    

Similar News