मंत्रीपदाच्या मोहात न अडकता लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी यशोमती ठाकूर मैदानात..

Update: 2022-07-06 06:55 GMT

आपलं मंत्रिपद गेलं म्हणून अनेक दिवस रुसवे, फुगवे करत मंत्री पदाच्या मोहात अडकून पडलेले अनेक मंत्री तुम्ही पाहिले असतील. मंत्रिपद गेलं तरी कित्येक दिवस शासकीय निवासस्थान वापरायचं, शासकीय कार्यालय सोडायचं नाही व ज्या काही शासकीय योजनांचा जितका वेळ वापर करता येईल तितका वेळ करत राहायचं व अनेक दिवस मुंबईतच ठाण मांडून बसायचं असं मंत्रिपद गेल्यावर अनेकांनी केलं आहे. पण आज मात्र एक वेगळे चित्र पाहायला मिळालं. तिवसा मतदार संघाच्या आमदार व राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री adv. यशोमती ठाकूर यांनी मंत्रीपद गेल्यानंतर काहीच दिवसात मतदारसंघात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या नेहमीप्रमाणे थेट लोकांमध्ये पाहायला मिळाल्या. इतकंच नाही मंत्रीपद जाताच दुसऱ्याच दिवशी तत्काळ आपलं शासकीय निवासस्थान, कार्यालय इतकंच काय मंत्र्यांना मिळणाऱ्या सर्व शासकीय सेवा-सुविधांचा त्याग करत त्या आपल्या मतदारसंघात पोहोचल्या आहेत.

अमरावती जिल्ह्यातील विविध गावात पूरस्थिति आहे. काल ४ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या अतिवृष्टीचा तिवसा तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला. रात्रीच्या सुमारास जोरदार पावसामुळे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे अन्नधान्य व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर ॲड.. यशोमती ठाकूर यांनी तातडीने तालुक्यातील तिवसा, मोझरी, वरखेड, तारखेड व सातरगांव आदी गावांना भेट घेत झालेल्या नुकसानाची पाहणी केली. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे, तसेच पावसाच्या पाण्यामुळे शेती वाहून गेल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले. काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशावेळी ॲड. यशोमती ठाकूर यांनी आपला नियोजित जनता दरबार रद्द करून थेट पूरग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू केला आहे. नागरिकांना धीर देतानाच येथील पूरस्थितिची ठाकूर यांनी पहाणी केली. स्थानिक जनतेशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच प्रशासनाला पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केलेल्या आहेत.



 या अतिवृष्टीच्या संकटामुळे नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर त्या म्हणाल्या मोर्शी, तिवसा व अमरावती तालुक्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेतीला सुद्धा याचा फटका बसला आहे. त्यामुळे हे संकट सर्वांसाठीच मोठे संकट ठरले असून या नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असून आम्ही कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या पाठीशी असतो. या वेळीसुद्धा त्यांना सर्वकष मदत मिळावी यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:    

Similar News