केवळ पक्षबदल की 'वारसा' झटकून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न? - प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश
राजकारणात जेव्हा एखादी महिला मोठी उडी घेते, तेव्हा समाज तिच्याकडे दोन चष्म्यातून पाहतो – एक तर ती कोणाची तरी मुलगी/पत्नी आहे किंवा ती केवळ संधीसाधू आहे. पण काँग्रेसच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा याकडे केवळ 'पक्षांतर' म्हणून न पाहता, एका महिला नेतृत्वाची राजकीय महत्त्वाकांक्षा आणि अस्तित्व टिकवण्याची धडपड म्हणून पाहिले पाहिजे.
'वारशाच्या' पलीकडचे राजकारण
प्रज्ञा सातव यांची आतापर्यंतची ओळख 'स्व. राजीव सातव यांच्या पत्नी' अशी राहिली. राजीवजींचे अकाली जाणं आणि त्यानंतर प्रज्ञाजींनी राजकारणात पाऊल ठेवणं, हे भावनिक होतं. पण किती काळ एका महिलेने केवळ 'वारसा' म्हणून राजकारणात राहावे? प्रज्ञा सातव या स्वतः डॉक्टर आहेत, उच्चशिक्षित आहेत. त्यांनी घेतलेला हा निर्णय दर्शवतो की, आता त्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वतःच्या अटींवर राजकारण करायचे आहे.
महिलांसाठी राजकारण हे 'सॉफ्ट' क्षेत्र नाही
अनेकांना वाटेल की त्यांनी काँग्रेसशी 'गद्दारी' केली. पण आपण हे विसरतो की, राजकारण हे पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही एक 'करिअर' आहे. जर एखादी सुशिक्षित महिला आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेत असेल, तर तिला दोष का द्यावा? पुरुष नेत्यांनी पक्ष बदलले की ती 'रणनीती' ठरते, मग महिलेने बदलला की त्यावर प्रश्नचिन्ह का?
मराठवाड्याच्या नेतृत्वात स्त्री शक्तीची गरज
मराठवाड्यासारख्या भागात जिथे अजूनही राजकारणात पुरुषांचे वर्चस्व आहे, तिथे प्रज्ञा सातव यांनी आपली ताकद टिकवून ठेवण्यासाठी भाजपसारख्या मोठ्या संघटनेची साथ निवडली आहे. त्यांच्याकडे असलेली कोट्यवधींची संपत्ती किंवा त्यांचे शिक्षण हे सिद्ध करते की, त्या सक्षम आहेत. त्यांना कोणाच्या आधाराची नाही, तर एका भक्कम व्यासपीठाची गरज होती, जे त्यांना भाजपमध्ये दिसत असावे.
निर्णयाचा आदर पण जबाबदारीची जाणीव
दरम्यान या सगळ्या चर्चांना फाटा देत प्रज्ञा सातव एका माध्यमांशी बोलताना सांगतात की,..... कळंबोलीचा विकास आणि शेती-सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी विकासाच्या या प्रवाहात सामील होत आहे. जरी मी हा निर्णय घेतला असला, तरी सोनिया गांधी आणि राहुल गांधी माझ्यासाठी आजही दैवतासमानच आहेत आणि त्यांच्याबद्दलचा माझा आदर कायम राहील. काँग्रेसने मला दोनवेळा संधी दिली त्याबद्दल मी कृतज्ञ आहे, पण आता मला केवळ माझ्या भागातील प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून विकासाला गती द्यायची आहे." प्रज्ञा सातव यांनी पक्ष बदलला असला तरी, त्यांनी ज्या मतदारांच्या जोरावर ही मजल मारली आहे, त्यांच्या प्रश्नांशी त्या किती प्रामाणिक राहतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. प्रज्ञा सातव यांचा हा प्रवास आता एका नव्या वळणावर आहे. काँग्रेसमधील निष्ठा आणि भाजपमधील सत्तासंघर्ष यांच्यात त्यांनी आपला मार्ग निवडला आहे. एक महिला म्हणून त्यांच्या या धडपडीकडे सकारात्मकतेने पाहतानाच, त्यांनी सत्तेचा वापर सामन्यांच्या विकासासाठी करावा, हीच अपेक्षा आहे. "स्त्रीने केवळ 'सहानुभूती' मिळवून राजकारण करण्यापेक्षा 'सत्ता आणि अधिकार' गाजवून बदल घडवला पाहिजे. प्रज्ञा सातव यांचा हा निर्णय त्या दिशेने पडलेले पाऊल आहे का, हे काळच ठरवेल."