शेतीतील नवदुर्गा १: तुझ्या अथांग हिंमतीनं, बहरला रानमळा...

प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांच्या यशोगाथा सांगितल्या जात असताना, शेती क्षेत्रातील नवदुर्गांचा प्रवास कोण सांगणार? लग्नापूर्वी शेतीत कुठलाही अनुभव नाही. मात्र, तिने पतीच्या पडत्या काळात जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेत साडेतीन एकराची शेती वीस एकरावर नेली... कसा होता नवदुर्गा जयश्री पाटील यांचा हा प्रवास... वाचा

Update: 2020-10-22 03:32 GMT

Courtesy: Sahyadri Farms - Corporate

शिक्षण नववी पर्यंत होऊन वयाच्या १८ व्या वर्षी जयश्री ताईंचे लग्न झाले. माहेरी असताना शेतीत कधीही काम करण्याचा अनुभव नव्हता. लग्न होऊन निळवंडीस आल्यावर हळूहळू शेतीत काम करू लागल्या. सुरूवातीला शेतीत कमी क्षेत्र होते.


Courtesy: Sahyadri Farms - Corporate

या दरम्यान पती रामदास पाटील यांची तब्येत जरा ठीक नसताना त्यांनी बर्‍यापैकी जबाबदारी जयश्री ताईना दिली. या काळात पतीच्या पाठीशी उभे राहून हिंमतीने काम करत शेती व्यवस्थापनाची जबाबदारी घेतली. घरी सासू-सासरे, मूलं या सर्वांची आणि घराचं सर्व नियोजन सांभाळत यानंतर शेतीतले सर्व व्यवस्थापन त्या सांभाळू लागल्या. सुरूवातीला साडेतीन एकरचे असणारे क्षेत्र आज २० एकर झाले असून यामध्ये पुर्णपणे द्राक्ष लागवड केली आहे.


Courtesy: Sahyadri Farms - Corporate


विशेष म्हणजे खडकाळ भागात हे क्षेत्र असून देखील यामध्ये द्राक्ष छाटणी, फवारणी, खतं-औषधं नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मजुरांचे व्यवस्थापन हे सर्व यशस्वीरीत्या पार पाडत साधारण १४०० क्विंटलच्या वर शेतमालाची निर्यात केली जाते. सुरूवातीला एक महिला ट्रॅक्टर वगैरे चालवते आहे बघून साहजिकच गावातील लोकांना जरा वेगळं वाटू लागले. पण पती रामदास पाटील यांचा आधार भक्कम होता आणि मग स्वत: अगदी जबाबदारीने शेती व्यवस्थापन त्या करू लागल्या.

Courtesy: Sahyadri Farms - Corporate

द्राक्ष हे आज अतिशय जोखमीचे पीक असल्याचे म्हटले जाते. पण पती रामदास यांच्या म्हणण्यानुसार "पुरुषांपेक्षा स्त्रियांकडे कामामध्ये जास्त बारकाईने बघण्याचा दृष्टीकोण असतो" आणि याच वाक्यास एक जीवंत उदाहरण बनून आज पतीच्या खांद्याला खांदा देत न डगमगता ताठ मानेने शेती क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणार्‍या सह्याद्रीच्या या नवदुर्गेस सलाम!


Tags:    

Similar News