जेसिंडा आर्ड्रन नावाची दुर्गा!

न्यूझीलंड सारख्या देशाच्या वयाच्या 37 व्या वर्षी पंतप्रधान झालेल्या जेसिका आर्डन नक्की कोण आहेत? वाचा ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचा लेख...

Update: 2020-10-18 10:42 GMT

Courtesy -Social media

भारतात नवरात्रीची धूम सुरू असताना, न्यूझीलंडमध्ये जेसिंडा आर्ड्रन नावाची दुर्गा पुन्हा पंतप्रधान होणं आश्वासक आहे! ही जेसिंडा आहे अवघ्या ४० वर्षांची. वयाच्या ३७ व्या वर्षी त्या पंतप्रधान झाल्या. त्यापूर्वी काही दिवसांपासून आपल्या मित्रासोबत त्या 'रिलेशनशिप'मध्ये होत्या. पंतप्रधान होताच बाईंनी पहिली 'गुड न्यूज' दिली आणि पदावर असतानाच त्या 'बाळंतपणाच्या सुटी'वर गेल्या. एका गोड मुलीच्या आई झाल्या.आई झाल्यानंतर मग त्यांनी लग्नाची घोषणा केली. (अजून ते रितसर केलेलं नाहीच!)

मोकळी, खुली, उदार, लोकशाहीवादी, स्त्रीवादी अशी ही धीट महिला न्यूझीलंडसारख्या शांत, चिमुकल्या देशाची पुन्हा पंतप्रधान झाली आहे. निवडून आल्यावर जेसिंडा म्हणाल्या, "जग विभागलं जातंय. ध्रुवीकरण होतंय. अशावेळी सामाजिक समतेसाठी आपल्याला हातात हात घालून काम करावं लागणार आहे. आपल्याला न पटणारा विचार ऐकूनच घ्यायचा नाही, असं हे जग झालं आहे. पण, या निकालानं सिद्ध केलं की न्यूझीलंड त्या वाटेनं जाणार नाही."

या निवडणुकीत जेसिंडांच्या उदारमतवादी मजूर पक्षानं ऐतिहासिक यश मिळवलं. गेल्या पन्नास वर्षांत कधी नव्हे, असं एकहाती स्पष्ट बहुमत मिळवलं. न्यूझीलंड म्हणजे छोटी छोटी बेटं. बहुतांश लोकांना कोणताही धर्म नाही. लोकसंख्या अवघी ५० लाख. कदाचित त्याहूनही कमी. म्हणजे, आपलं पुणे -पिंपरीही त्याहून मोठं. पण, जगातला सर्वात सुरक्षित देश, अशी ओळख आहे या बेटांची.

अर्थात, तिथंही सारं आलबेल नाही. पण, ते नंतर कधी. तर, जेसिंडा अवघ्या २८ व्या वर्षी तिथं खासदार झाली. आणि, पंतप्रधान असताना तर ती 'विघ्नहर्ता' ठरली. आपत्तीवर मात करण्यात जेसिंडांचा हातखंडा आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यातही न्यूझीलंड सगळ्यांच्या पुढे आहे. त्यात या सजग पंतप्रधानांचा वाटा मोठा. मुळातच हा देश तसा जगापासून क्वारंटाइन... बेटाचा. पण, तिथंही 'कोरोना' पोहोचलाच. तेव्हा जेसिंडाबाई तातडीने कामाला लागल्या आणि यशस्वी ठरल्या.

आम्हाला आणखी कौतुक म्हणजे, जेसिंडाही 'मास कम्युनिकेशन'ची विद्यार्थिनी आहे आणि अगदी अल्प काळ त्यांनी पत्रकारिताही केली आहे. त्यांचा 'पार्टनर' क्लर्क गेफोर्ड हा तर ऑफिशियली ॲंकर, पत्रकार! त्यामुळं जेसिंडांचं आम्हाला जास्तीच कौतुक. असो.

- संजय आवटे

Tags:    

Similar News