चला, मतिमंदत्व टाळूया !

मतिमंदत्व म्हणजे काय ? मतिमंद मुले जन्माला येऊ नयेत यासाठी कोण-कोणत्या प्रतिबंधात्मक गोष्टी गर्भधारणे अगोदर आणि गर्भावस्थेत करून घ्यावे? जाणून घ्या स्त्री रोग तज्ज्ञ साधना पवार यांच्याकडून

Update: 2021-04-18 11:35 GMT

का बरं नोकरी सोडताय? मी विचारलं... मॅडम, मला बारा वर्षांची मतिमंद मुलगी आहे. तिचं सगळं करणं फार अवघड होत चाललंय आताशा मला. ती क्षणात बरी असते तर क्षणात आदळआपट सुरु करते. आतापर्यंत मी मिस्टरांबरोबर नोकरी करत करत सगळं केलं पण तिला आता पाळी सुरु झालीय आणि ती तिला ओलं वाटलं की सरळ आत हात घालून पॅडवगैरे सगळं बाहेर काढून फेकते. तिचं खाणं, पिणं, स्वच्छता कसं मॅनेज करायचं सांगा ? तिची गर्भ पिशवीच काढून टाकाल मॅडम तुम्ही? तिच्यावर कशी आणि कुठवर लक्ष ठेवायचं मी ?

त्या विचारत होत्या.. विचारात पडले, किती अवघड आहे मतिमंद मुलांचं पालकत्व ! फक्त जिवंत असणं म्हणजे जीवन नाही, तुम्ही जगता त्या आयुष्याच्या quality ला (quality of life ) पण किती महत्व आहे ?

'मतिमंदत्व' म्हणजे आय क्यू साधारण सत्तरपेक्षा कमी असणे.पन्नास पेक्षा कमी असेल तर ते जास्त तीव्रतेचे मतिमंदत्व असते. अश्या मुलांचे आयुष्य तर खडतर असतेच पण अश्या मुलांच्या पालकांचेही आयुष्य खूप अवघड बनून जाते. 'तारे जमीनपर' सिनेमातील ती ट्युलिप स्कूल मधील मुलं आठवतात ? किती निरागस किती निर्मळ असतात ही मुले... पण त्यांना मतिमंदत्वाबरोबरच इतरही शारीरिक व्याधी असण्याची शक्यता असते. डाउन्स सिंड्रोम प्रकारच्या मतिमंदत्वामध्ये हृदय आणि किडनी चे प्रॉब्लेम्स असू शकतात.

या मुलांचे आयुष्य बऱ्याचदा परावलंबी असते आणि त्यामुळे कुटुंबाचे शारीरिक मानसिक आणि आर्थिक हाल होऊ शकतात. पण अलीकडे काही वर्षात अशी मुले कमी जन्माला येताहेत असे तुम्हाला जाणवले आहे का ?हो, वैद्यकीय क्षेत्राने मतिमंदत्वाचे गर्भावस्थेतच अगदी तिसऱ्या चौथ्या महिन्यातच निदान होईल अश्या रक्ताच्या टेस्ट (markers)आणि सोनोग्राफी मधील खुणा (soft markers)शोधल्या आहेत. गर्भाच्या सोनोग्राफीमध्ये अश्या मतिमंदत्व असलेल्या गर्भांना काही विशिष्ट अशी वेगळी व्यंगे किंवा खुणा आढळतात, त्यावरून अंदाज बांधून पुढील कन्फर्म करणाऱ्या टेस्ट केल्या जातात. उदाहरणार्थ गर्भाच्या मानेमागील त्वचेची जाडी जास्त असणे.

पूर्वी, म्हणजे काही वर्षांपूर्वी गर्भधारणेच्या वेळी जर तुमचे वय जास्त असेल तर, आधीचे बाळ मतिमंद किंवा इतर काही व्यंग असलेले असेल तरच या रक्ताच्या मार्कर टेस्ट्स सुचवल्या जायच्या. पण आता आम्ही सर्वच गरोदर स्त्रियांनी 11 ते 13 आठवड्यात केला जाणारा एन टी स्कॅन आणि त्याबरोबर डबल मार्कर ही रक्ताची टेस्ट करावी असे सुचवतो आणि त्यासाठी थोडे आग्रही सुद्धा असतो. कारण पस्तिशीनंतर गर्भधारणा झालेल्या स्त्रियांना डाउन्स सिंड्रोम असलेले बाळ जन्मण्याचे प्रमाण जास्त असले तरी कोणत्याही वयातील गरोदरपणात तो नसेलच असे खात्रीने सांगता येत नाही.

काही कारणांनी जर अकरा ते तेरा आठवड्यात केली जाणारी डबल मार्कर टेस्ट केली नसेल तर नंतर पंधरा ते बावीस आठवड्यांमध्ये quaduple मार्कर ही टेस्ट केली जाऊ शकते. रक्ताच्या मार्कर टेस्ट, एन टी स्कॅन सोनोग्राफी मतिमंदत्वाचे फक्त सिग्नल देतात हे मात्र लक्षात घ्यायला हवे. या तपासण्यांमध्ये काही दोष आढळला तर गर्भ मतिमंद आहेच असा अर्थ नसतो तर तशी तो असण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यासाठी कन्फर्मेटरी टेस्ट कराव्या लागतील असा होत असतो.

गर्भाचा भोवतालचे पाणी काढून किंवा वारेचा छोटासा तुकडा काढून त्यातले गर्भाचे जनुक तपासल्यासच मतिमंदत्वाचे शंभर टक्के निदान होऊ शकते. अलीकडे आईच्या रक्तातून गर्भाच्या पेशींचे जनुक काढणेही शक्य झाले आहे (nipt ) ,पण त्यापेक्षा गर्भजल परीक्षणच कन्फर्मेशन साठी जास्त योग्य. क्वचित प्रसंगी या टेस्ट करूनही काहीच सिग्नल मिळत नाही आणि मतिमंदत्वाचे निदान जन्मानंतरच होते असेही होऊ शकते, हे ही लक्षात ठेवायला हवे.

कधी-कधी एखादे जोडपे असे निदान झाले तरीही गर्भपात करण्यास नकार देते, जसे असेल तसे मूल वाढवण्याची त्यांची तयारी असते पण बहुतांश पालक असा गर्भ असेल तर गर्भपात करून घेतात. मतिमंद मुले जन्माला येऊ नयेत म्हणून... नात्यात लग्ने टाळावीत, वयाच्या पस्तीशीनंतर स्त्रियांनी गर्भधारणा टाळावी, पुरुषांनी चाळिशीनंतर वडील बनणे टाळावे, गर्भावस्थेत एन टी स्कॅन, ऍनोमली स्कॅन आणि डबल किंवा quadruple मार्कर या तपासण्या योग्य वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्याव्यात. गरज भासली तर गर्भजल परीक्षण करावे. गर्भावस्थेत दारू, सिगारेट, ड्रग्स यांचे सेवन करू नये. गर्भावस्थेत पोषक आहार घ्यावा व कोणतीही इन्फेक्शन्स होऊ नये यासाठी जागरूक राहावे. थायरॉईडची तपासणी करून ते कमी असल्यास त्याची गोळी घ्यावी.

नैसर्गिक प्रसूतीसाठी अडचण असल्यास आणि डॉक्टरांनी सिझेरियनचा पर्याय सांगितला असल्यास नॉर्मलच करा असा अट्टाहास करू नये कारण कधी कधी क्वचित प्रसंगी त्यामुळे बाळाच्या मेंदूत रक्तस्त्राव होऊन किंवा बाळाच्या मेंदूला ऑक्सिजन न मिळाल्याने अशी बाळे आयुष्यभरासाठी मतिमंद होऊ शकतात.

जन्मानंतर बाळाला काविळ असेल तर त्यावर लगेच उपचार करून घेणे. मतिमंद मुले जन्माला येऊ नयेत यासाठी सर्व प्रतिबंधात्मक गोष्टी गर्भधारणे अगोदर आणि गर्भावस्थेत करून घेऊन आपण सुप्रजनन साधूया. चला, वैद्यकीय क्षेत्रातील या चांगल्या संशोधनाद्वारे एकही मतिमंद मूल जन्माला येऊ नये यासाठी प्रयत्नशील राहूया.

डॉ. साधना पवार, स्त्री रोग तज्ज्ञ

MBBS DGO , डॉ. पवार हॉस्पिटल, पलूस

Similar News