या टोल फ्री नंबरवर महिलांचे दारूसाठी फोन येतात ?

Update: 2023-05-20 14:25 GMT

दारूसाठी माणूस काय काय करतो? पण बिहार मध्ये सध्या दारूविषयी कोणता नवीन प्रयोग सुरु आहे ?याची खास माहिती देणारा हेरंब कुलकर्णी यांचा हा खास लेख जरूर वाचा... 

सध्या मी बिहारमध्ये फिरतो आहे. दारूबंदी केल्यापासून २४ तास उपलब्ध असलेला टोल फ्री क्रमांक दिला आहे. आज पाटणा येथील सचिवालयात जाऊन टोल फ्री नंबर कक्ष बघितला. जवळपास २० कर्मचारी कानात हेडसेट घालून बसलेले. सतत फोन येत होते.

रोज या कक्षात दारू विषयी ४०० फोन येतात,महिन्यात १२०००पेक्षा जास्त तक्रारी होतात आणि विशेष म्हणजे दोन तासात त्यावर कारवाई करून ज्याने तक्रार केली त्याला काय कारवाई केली कळविण्याचे बंधन आहे..हे खरे वाटत नाही पण हे होत आहे. फोन आल्यावर तो नंबर गुप्त ठेवून जवळच्या पोलिस स्टेशनला कारवाई करण्याचे कळवले जाते आणि त्यांना २ तासात कारवाई करून कळविण्याचे बंधन आहे.

पोलिस कारवाई करून फोटो पाठवतात. ती माहिती तक्रारदार यांना कळवली जाते. त्यांचे समाधान झाले का हे विचारले जाते. जर त्यांचे समाधान झाले नाही तर ते पुन्हा तक्रार करू शकतात. पूर्ण २४ तास रात्रीही हे काम सुरू आहे. होळी च्या दिवशी ८०० तक्रारी आल्या होत्या. लोकांना हा क्रमांक माहीत व्हावा म्हणून राज्यातील प्रत्येक इलेक्ट्रिक पोलवर टोल क्रमांक लिहिलेला आहे.

दारूबंदी यशस्वी की फसली यावर जरूर चर्चा करू पण शासन म्हणून होत असलेले हे प्रयत्न कौतुकास्पद आहे. पोलिसांनी कितीही भ्रष्टाचार करून दारू सुरू ठेवली तरी लोक ज्या तक्रारी करतात त्यातून पोलीस उघडे पडतात.

महाराष्ट्रात बालविवाह सारख्या कितीतरी समस्यांवर असे टोल फ्री क्रमांक राज्य स्तरावर तयार केले तर मोठा फरक पडेल. दुर्दैवाने असे टोल फ्री क्रमांक आहे पण ते उचलले जात नाहीत. इथे तक्रारदाराला रिपोर्ट केला जातो...बिहार सारख्या राज्याकडून महाराष्ट्र सरकारने शिकायला हव्या अशा अनेक गोष्टी मी बघतो आहे.

हेरंब कुलकर्णी

Tags:    

Similar News