शेतीतील नवदुर्गा 2: हिंमतीची वाघिनी तू...

पतीच्या निधनानंतर 30 लाख रुपयांच्या कर्जाचा बोजा डोक्यावर असताना परिस्थितीशी दोन हात करत यशस्वी लढा देणारी आजची आपली नवदुर्गा: संगीता अरुण बोरस्ते... हिंमतीची वाघिन

Update: 2020-10-22 03:44 GMT

वयाच्या १५ व्या वर्षी १९९० साली संगीता ताईंचा साकोरे मिग, निफाड, जि. नाशिक येथील अरुण बोरस्ते यांच्याशी विवाह झाला. पुढे १९९१ साली एकत्र असलेले त्यांचे कुटुंब विभक्त झाले. पती अरुण यांनी आपली बँकेची नोकरी सोडून शेतीचे काम बघण्यास सुरुवात केली. २०१४ साली नुकतीच द्राक्ष बागांची छाटणी झाली होती आणि पती अरुण हे नवरात्रीच्याच काळात निधन पावले. या घटनेमुळे खूप मोठा धक्का कुटुंबाला बसला होता. त्या काळात संगीता ताईंच्या पदरात तीन मुली आणि एक मुलगा यांची जबाबदारी आणि ३० लाख एवढे कर्ज फेडायचे बाकी होते. त्यामुळे हा काळ अतिशय कठीण होता. शेवटी पुन्हा जिद्दीने उभे राहत संगीता ताईंनी या परिस्थितीशी लढा द्यायचे ठरवले. आता केवळ एकच लक्ष्य होते की, शेतीत कष्टाने काम करून यश मिळवून आपल्या मागे असलेल्या चारही मुलांचे भविष्य घडवायचे.

पती अरुण असेपर्यंत खरंतर द्राक्ष बागेतल्या कुठल्याही कामाविषयी माहिती संगीता ताईंना नव्हती. अरुणजींच्या निधनानंतर विम्याचे १८ लाख रुपये मिळाले. मग ही रक्कम शेतीत भांडवल म्हणून वापरण्यात आली. पुतणे सचिन बोरस्ते आणि कन्सलटंट यांच्या मदतीने शेतीविषयी मार्गदर्शन घेत घरची संपूर्ण शेती सांभाळण्यास सुरुवात केली. अतिशय जिद्दीने काम करत शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत संगीता ताईंनी ही परिस्थिती बदलण्यास सुरुवात केली. द्राक्षात थॉमसन, गणेश अशा व्हरायटींची लागवड करत, चांगले उत्पादन काढत 'सह्याद्री'च्या मदतीने द्राक्ष हार्वेस्टिंग आणि एक्स्पोर्ट करण्यास सुरुवात केली.

हळू हळू चित्र पालटत गेले आणि डोक्यावर असलेले कर्ज पूर्णपणे फेडून आपल्या चारही मुलांना उत्तम शिक्षण देत दोन मुलींचे लग्न देखील लावून दिले. सध्या कुटुंबात लहान मुलगा, एक मुलगी आणि संगीता ताई असे तिघे जण असून दोघेही मूलं आपल्या आईच्या या वाटचालीत भक्कम साथ देत आहेत. आता पुढे एकच स्वप्न आहे की मुलांनी शिक्षण घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत याच शेतीत नवनवीन प्रयोग घडवून आणावेत. पतीच्या निधनानंतर ते आजपर्यंतचा संगीता ताईंचा हा प्रवास अतिशय खडतर असला तरी आज त्यांच्या सारख्या अनेकांच्या आयुष्यात एक आदर्श ठेवणारा आहे. आयुष्यात आलेल्या अनेक संकटांना पायदळी तुडवत हिंमतीने वाटचाल करणाऱ्या सह्याद्रीच्या या नवदुर्गेस सलाम!

Tags:    

Similar News