'जहांनारा अखलाक' माझी लाडकी पाकिस्तानी मैत्रीण. तिचा लाहोरमध्ये खून झाला, त्याला 26-27 वर्ष लोटली. अतीशय प्रोग्रेसिव्ह कुटुंबातली जहांनारा टोरांटो, कॅनडामध्ये स्थायिक झालेली अप्रतिम कथक नर्तिका. चेन्नईला 3 महिने कोरियॉग्राफर चंद्रलेखाकडे आम्ही दोघी एकाच वेळी नृत्यविचार शिकायला राहावं, हा 1998 मधला एक कमालीचा योगायोग.
जितक्या लवकर तुम्ही विविध देशांतल्या, राज्यांतल्या माणसांना भेटता, समजून घेता, मैत्री करता, तितक्या लवकर तुम्हाला इतरांना सामावून घेता येत असावं. त्यांच्याबद्दल प्रेम, कृतज्ञता, आदर वाटत असावा.
जहांनाराचे वडील प्रोग्रेसिव्ह चित्रकार होते. त्यांना मारण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी टेररिस्टसनी झाडलेल्या गोळ्यांपासून वडिलांना वाचवण्यासाठी जहांनारा मधे पडली. एक गोळी तिला लागली. ती आणि तिचे वडील दोघेही जागच्या जागी ठार झाले....
आमचा 3 महिन्यांचा चेन्नईमधला सहवास फार सुंदर होता. ती एक अतिशय डौलदार आणि ताकदवान नृत्यांगना होती. चंद्रलेखाच्या एका कोरियॉग्राफीमध्ये आगीने पेटलेलं एक लाकूड घेऊन ती स्टेजवर प्रवेश करायची. अतिशय संथ, कंट्रोल्ड आणि ग्रेसफुल हालचालींनी स्टेजवर सादरीकरण करायची. हे सगळं जवळून बघताना मनात उमटलेली दृश्य, भावना अजूनही एक कोपरा व्यापून आहेत. ती पाकिस्तानी होती याचा विसर पडला होता, इतकी आमची मैत्री झाली. ती म्हणायची 'पाकिस्तानी आणि भारतीय अगदी सारखी माणसं आहेत'... तो 1998 चा काळ होता... तिला भारतात येणं सुरक्षित वाटलं होतं.
इलियट्स बीचवरचं चन्द्रलेखाचं घर + स्टुडिओ+ थिएटर, तिथेच आम्ही विद्यार्थी राहायचो. कळरीपयट्ट, छाऊ नृत्य, योग शिकायचो. एक कोरियॉग्राफी चंद्रलेखा कशी तयार करते, याची प्रक्रिया जवळून बघणं, याने माझं आयुष्य बदलून गेलं. एकदा स्टेजवर वापरायची एक शिडी जहांनारा आणि मी रंगवत होतो. चेन्नईचा भीषण पाणी प्रश्न तेव्हाही होताच. हात धुवायला पाणी नव्हतं... जहांनारा इतकी मोकळी आणि क्रिएटीव्ह होती. ती म्हणे 'पाणी नाही म्हणून का तक्रार करतोय आपण? समुद्राशेजारी राहतो... चल समुद्रात हात धुवून येऊ.' आम्ही साबण घेऊन समुद्रात जाऊन हात धुवून आलो होतो.
अशी समुद्राला कवेत घेणारी मैत्रीण दहशतवाद्यांच्या संकुचित विचारांमुळे मारली जाणं हे भीषण होतं. दहशतवाद संपवण्याच्या प्रयत्नात किती निष्पाप अजून मारले जाणारेत कोण जाणे! युद्ध थांबो, हल्ले करणं लगेच संपो... दहशतवाद संपो. ही प्रार्थना.
8.5.2025
आभा भागवत