स्त्रियांच्या मनातले कॉपर टी बद्दलचे गैरसमज आणि सत्य...

Update: 2023-08-10 04:34 GMT


 'कॉपर टी' (copper tea)याविषयी महिलांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. अनेकांना एकच मुल हवं असतं आणि त्यानंतर गर्भधारणा रोखण्यासाठी महिला वारंवार गर्भनिरोधक गोळ्या घेत राहतात. पण हे जास्त काळासाठी योग्य नाही. गर्भधारणा रोखण्यासाठी कॉपर टी हा उत्तम पर्याय आहे. पण याविषयी स्त्रियांच्या मनात हे केल्यानंतर आपली सेक्शुअल क्षमता कमी होते किंवा यामुळे वजन वाढतं असे अनेक गैरसमज आहेत. पण कॉपर टी विषयी डॉक्टर काय म्हणतात हे महत्वाचं आहे. त्यामुळे यापाठीमागील सत्य जाणून घेण्यासाठी स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ डॉ शिल्पा चिटणीस जोशी यांचा हा लेख नक्की वाचा...

"अग गेल्या वर्षभरात हा तिसरा गर्भपात करायला आली आहेस तू! मी गेल्यावेळी च तुला बजावलं होतं कॉपर टी साठी पाळीच्या पाचव्या दिवशी ये म्हणून..का आली नाहीस?"

"मॅडम मला खूप भीती वाटते कॉपर टी ची.!"

"आणि वारंवार गर्भपाताची भीती वाटत नाही?"मी थक्क होऊन विचारले..

ह्या पेशंट सारख्या मानसिकतेत बऱ्याच स्त्रिया असतात.

लग्नानंतर एक मूल होईपर्यंत गर्भनिरोधक गोळ्या हा कुटुंबनियोजनाकरता उत्तम उपाय असतो .हल्ली बहुतेक जोडप्यांना एकच मूल हवे असते.मग गर्भ निरोधक गोळ्या अनिश्चित काळासाठी घेतल्या जाऊ शकत नाहीत.

त्यामुळे एका अपत्यानंतर कॉपर टी हाच पर्याय योग्य ठरतो.

कॉपर टी बद्दल खूप गैरसमज आणि त्यामुळे अनाठायी भीती स्त्रियांच्या मनात बसलेली आहे.

कॉपर टी शक्यतो एक मूल असलेल्या महिलेच्या गर्भाशयात पाळीच्या पाचव्या दिवशी बसवली जाते.तीन , पाच किंवा दहा वर्षे मुदत असलेल्या कॉपर टी उपलब्ध आहेत.पण त्या मुदतीच्या आधी सुद्धा कधीही काढता येतात.

कॉपर टी गर्भाशयात शुक्राणू साठी प्रतिकूल वातावरण निर्माण करते तसेच गर्भ रुजण्याची प्रक्रिया थांबवते त्यामुळे गर्भधारणा होत नाही.त्याचा कोणत्याही हार्मोन्स शी काही संबंध नसतो. तसेच कॉपर टी मुळे वजन वाढणे किंवा कमी होणे अजिबात शक्य नसते.कॉपर टी मुळे माझं वजन वाढलं किंवा कमी झालं हा स्त्रियांमध्ये असलेला सर्वात मोठा गैरसमज आहे.

कॉपर टी चे काही फायदे तोटे बघूया.

फायदे

१.एका अपत्यानंतर खात्रीशीर,सुरक्षित कुटुंब नियोजनाचा पर्याय.

२.जेव्हा परत प्रेगनन्सी हवी आहे असं वाटेल तेव्हा कॉपर टी लगेच काढून टाकता येते.पुढच्या महिन्यापासून कधीही गर्भ धारणा होऊ शकते.

३.नको असलेल्या गर्भधारणेची भीती नसल्यामुळे जोडप्याचे लैंगिक जीवन निकोप राहते.

४.कॉपर टी मुळे कोणत्याही हार्मोन्स वर काही परिणाम नसल्यामुळे चाळिशी पर्यंत सुद्धा ती बसवता येऊ शकते.

कॉपर टी चे काही तोटे

१.कॉपर टी बसवल्यानंतर सुरवातीचे दोन तीन महिने जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो पण त्यासाठी औषधे देऊन तो नियमित करता येतो.

२.मधुमेह,काही प्रकारचे हृदयरोग,संसर्ग होण्याची शक्यता जास्त असलेल्या स्त्रियांमध्ये कॉपर टी बसवता येत नाही.

३.कॉपर टी ची नियमित तपासणी(दर सहा महिन्यांनी) आवश्यक असते.तसेच योनीमार्ग आणि गर्भाशयाच्या मुखावर संसर्ग किंवा जखम असल्यास त्याकडे लक्ष ठेवून वेळीच योग्य उपाय करणे आवश्यक ठरते.

तर मैत्रिणींनो कॉपर टी सारख्या कुटुंब नियोजनाच्या उत्तम साधनाबद्दल चुकीच्या समजुती दूर करून त्याचा फायदा करून घेण्यातच आपले हित आहे.हो ना?

डॉ शिल्पा चिटणीस जोशी

स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ

कोथरूड

पुणे

Tags:    

Similar News