सुखी संसाराचा 60-40चा फॉर्मुला तुम्हाला माहिती आहे का?

सोप्पं नसतं स्त्री बनणं... जबाबदाऱ्यांसह उत्तम गृहिणी बननं... महिलांना किचन मध्ये कुठे काय काम असतं असं म्हणणाऱ्यांना उत्तर देत सुखी संसाराचा फाॅर्मुला सांगताहेत धनंजय देशपांडे नक्की वाचा...

Update: 2021-07-21 03:26 GMT

गृहिणींवर बोलू काही
जे सहसा कुणी न पाही !

संसार, घर प्रपंच म्हटल्यावर यात दोघांचाही समान जसा हक्क तसेच समान जबाबदारी देखील ! मात्र मला स्वतःला हे फिफ्टी फिफ्टी गणित तितकं पटलं नाही. त्याऐवजी मी सिक्स्टी फोर्टी असं जास्त मान्य करेल. मीन्स "ती" सिक्स्टी पर्सेंट आणि "तो" फोर्टी पर्सेंट असतो. (हेही मी स्वानुभवाने सांगतोय, तेही मोकळेपणी) कारण खरं सांगू.... मी जे काही आजवर करू शकलो, मग ते करियर असेल, सामाजिक असेल किंवा अन्य काही त्या सगळ्यात मला घराने मोकळं ठेवलं हे श्रेय आहे. ना कधी पॅरेण्ट मिटिंग ना कधी "येताना भाजी आणा'चा तगादा ! त्यामुळे पूर्णवेळ पूर्ण ताकदीने मी काम करत राहिलो.

मात्र कधी कधी वेळ असायचा तेव्हा किचनमध्ये मी हमखास रमून जायचो. कुणी फर्माईश केली तर माझ्यातला प्रयोगशील शेफ जागा होऊन मसालेभात सारखा अनोखाच पदार्थहि बनवायचो. मात्र ते प्रमाण तसे कमीच ! पण ते जेव्हा कधी करायचो तेव्हा किचन मधील अनेक वस्तू मला काहीतरी खास सांगून जायच्या. अगदी चहा गाळणी पासून उलथन्या पर्यंत ! प्रत्येकाचे काहीतरी अस्तित्व जसे होते तसेच त्यांचे मनोगतही असू शकेल असं मला वाटायचं. म्हणजे असं की, बशी (म्हणजे "ती") फुटली तरी कप (म्हणजे "तो") जणू विधुर झाल्यासारखा कोपऱ्यात पडून असतो. किंवा गरम पातेले उचलणारा चिमटा सतत चटके बसून बसून आतल्या बाजूने भाजल्यागत काळा पडलेला असतो. तुम्ही आता पोस्ट वाचून झाल्यावर जाऊन पहा. लक्षात येईल. किचन मधील प्रत्येक वस्तू बोलत असते तिचं मनोगत ! फक्त ते ऐकण्यासाठी आपले कान तयार हवेत.

असा विचार आज सहज करत असतानाच तुळजापूरची माझी मावसबहीण (सौ शारदा कुलकर्णी) हिने एक सुंदर मेसेज पाठवला. (तोच सोबत देतोय) अन तो वाचल्यावर मला लक्षात आलं की, अरेच्या, मीही हेच म्हणतोय की !

तर मंडळी तुम्ही पण वाचून पहा ! पटतंय का ?

स्वयंपाक घर नेहमीच बोलतं आपल्यासोबत,

पोळपाट लगेच नाही धुतला तर फुगतो,

तवा भिजत ठेवला तर गंजतो.

कुकर नाही वेळेत बंद केला तर जळतो,

दुधाकडं नाही लक्ष दिलं तर ते उतु जातं,

गॅस वेळेत बंद केला नाही तर भाजी करपते.

तरी लोक म्हणतात,

यांना किचन मध्ये काय काम असतं.

बाहेर खाणार्यांेची मर्जी सांभाळा,

आत सामानाची.

किती कठीण असतो स्री जन्म...

सगळं स्वयंपाक घरातील सामान, आणि घरातल्यांची मनं सांभाळते ती उत्तम गृहिणी.

जी निर्जीव वस्तु देखील जीवापाड जपते.

पोळपाट फुगु देत नाही,

तवा गंजु देत नाही,

कुकर डागु देत नाही,

भाजी जळु देत नाही,

दुध चुकुन गेलंच उतु तर कृष्णार्पण म्हणुन मोकळी होते.

प्रत्येक स्त्री मधे उत्तम आई दडलेलीच असते.

ती माणसांच्या मुड सोबत घरातील वस्तुंचीही काळजी घेते.

म्हणून आजच्या सर्वच जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडतानाच एकीकडे गॅसवर (किंवा चुलीवर) भाजी शिजायला ठेवून ती दुसरीकडे लॅपटॉप वर "वर्क फ्रॉम होम" देखील करत असते.

अशा सर्व गृहिणींना मानाचा मुजरा!

@ धनंजय देशपांडे

Tags:    

Similar News