नाशिक मध्ये कदंब बहरलाय..

शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून समजले जाणारे विनायकदादा पाटील यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हेमलता पाटील यांचा हा लेख नक्की वाचा

Update: 2020-10-25 05:58 GMT

नाशिक मध्ये कदंब बहरलाय.. रस्त्यावर लालचुटूक फुलांची रांगोळी सर्वत्र विखुरलीय.. आणि या कदंबा वर आतोनात प्रेम करणारे एक कलेवर शांतपणे चितेवर स्थिरावलय.. आयुष्य जगावे तर असे स्वतःच्या टर्मस वरती. जाताना ना कुणा बद्दल आकस ना कुणाचा लोभ. प्रत्येकालाच ही व्यक्ती आपल्याशी कनेक्ट असली पाहीजे अस वाटणारे एक सार्थ आयुष्य... बोलताना एक एक शब्द तोलून बोलणारे एक कलेवर आज चिते वरती देखील तितक्याच शांत पणे पडलेय...

श्रद्धांजली कोणी कोणी वहायचीय? बापरे या सुन्न करणाऱ्या प्रसंगातही मला हसायला येतेय. आठवतोय एक शोक सभेचा प्रसंग. दादा माझ्या शेजारी बसलेत. शोक सभेला तुडूंब गर्दी.. तीन/ चार भाषणे झाल्यानंतर दादांचा संयम पार संपला. माझ्या कानात दादा हळूच पुटपुटतात हे श्रद्धांजली वहात आहेत की मेलेल्या ची पोलखोल करतायेत? मी मेल्या नंतर असले काही प्रकार नकोत. मी म्हटल दादा तुम्ही येवढ्यात मरणार नाहीत. हो पण जेंव्हा कधी मरेन तेंव्हा मला अशी श्रद्धांजली वाहिली तर मानगुटीवर बसेन मी.... कलेवर ला धाकधूक तर नसेल ना या भाषणांची??

हळूच कोणीतरी पुटपुटते "दहावा कधी?" परत मला हसू आले. दादा तुम्हाला भेटायला यायला थोडा उशीर होईल, गंगेवर आहे दहाव्या च्या कार्यक्रमाला. काय ग बाई मृतात्मा नीट घास घेऊन गेला ना? आणि आपल्याच पोराच्या हातचा घेतला की गर्दीत कन्फ्यूज झाला... आता यांचा दहावा घातला तर हे पोकळ बांबू चे फटकेच देतील... दादा तुम्ही नाशिकच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे तहहायात अध्यक्ष आहात. अग बाई कार्यक्रम संपेपर्यंत बसायला एक सिन्सियर म्हातारा लागतो म्हणून बोलवतात मला....

दादा तुम्ही कॉंग्रेस चे ना मग कशाला त्या पक्षाच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन करायला गेलात? बाई मी कुठेही गेलो तरी मला माझ्या पक्षनिष्ठेचे सर्टिफिकेटस नाही द्यावे लागत तीच तर कमाई असते आयुष्यभराची... दादा मला कंटाळा आलाय ( सहा महिन्यांपूर्वी राजकारणात आलेली मी) पक्षाच्या कार्यक्रमाला लोक घेऊन जाते आणि मला कोणी क्रेडिटच नाही देत. बाई देवाला अभिषेक घालताना दूध आणायला सांगीतले आणि येवढ्या दूधात माझे तांब्याभर पाणी खपून जाईल म्हणून प्रत्येकाने पाणीच आणले तर कसे चालेल? म्हणून आपण आपल्या वाट्याची दूधाची चरवी घेऊन जायची. नेतृत्वाला सगळे कळत असते.

दादां शरद पवारांच्या नावाने विचारमंच काढलाय आणि मला अध्यक्ष करतायेत. बाई त्याला शरदपवारच लाथ घालतील हे सगळे दूकानदार आहेत असल्या भानगडीत आपण नाही पडायचे... दादा मला .. हे पुस्तक हवे आहे. हो देतो की माझ्या कडे आहे ते पुस्तक हातात घेतले की दहाव्या मिनीटाला गाढ झोप लागते. तुला निद्रानाश असेल तर कायमचे तुझ्या कडे ठेव... दादा काय काय वाचले पाहीजे? बाई हा प्रश्न दुसऱ्याला इंप्रेस करायला विचारायचा असतो. तु मला इंप्रेस करायच्या भानगडीत पडू नको कारण तुझ्यात खुप चांगल्या कॉलिटीज आहेत फक्त तुझं शुद्धलेखन भयानक आहे. लिहतेस छान पण प्रत्येक वाक्याला र्हस्व/दिर्घ खटकतो. दादा आशय महत्वाचा. बाई संगितातल्या कोमल आणि शुद्ध ने जो फरक पडतो तोच फरक व्याकरणातल्या चूकांनी पडतो...

कलेवर च्या भोवती लाल/पिवळ्या ज्वाला पेटल्यात आणि माझ्या डोळ्यासमोर त्या ज्वालांमधून कदंबा ची लालचूटूक फुले सांडताना दिसतायेत अगदी चहूकडे. परत ही रूजणार आहेत इथल्याच मातीत आणि बहरणार आहेत इथल्याच वातावरणात...

डॉ. हेमलता पाटील

Tags:    

Similar News