'गावात राहून देखील 'आई' तुझ्या कामाचा संघर्ष खूप मोठा आहे'

Update: 2021-07-05 14:41 GMT

प्रत्येक माणसाने आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे असं म्हणतात, पण जेव्हा आर्थिक निर्णयांची वेळ येते तेव्हा तुझं मत सहसा विचारात घेतलं जात नाही. महिला म्हणून तू न कमावणं, हा तुझ्या शक्तीचा कमी वापर करणं असं होईल.



 


तू किती कमवते हा मुद्दा इथे गौण, पण कुणावरही विसंबून न राहता आपल्या उत्पनाचे स्रोत आपण उभारले पाहिजेत या मताची मला दिसलेली ती, माझी आई घराजवळील सगळी शेती सांभाळते. सोबतच अतिरिक्त उत्पन्न म्हणून कुक्कुटपालन देखील करतेय. ती नेहमी उत्पनाचे वेगळे-वेगळे स्रोत शोधत असते.




 


वर्षाकाठी चांगले पैसे कमावते, स्वतःचे बहुतांश खर्च स्वतः करते, आज तिने गायींसाठी नवीन गोठा बांधलाय. त्यात गाय, बकऱ्या आणि कोंबड्या यांचे एकत्रित उत्पन्न घेण्याचे तिचे प्लॅनिंग चालू आहे.



 शहरात जावं, नोकरी करावी, पैसे कमवावे आणि आपल्या पायावर उभे राहावे, असे वाटणाऱ्या महिलांचे मला कौतुकच आहे. पण गावात राहून घराची सगळी कामे बघून, गावात तिच्या स्वत: च्या विश्वात राहून माझी आई उत्पन्न कमावत आहे. ती कमी कमावते की जास्त, तो भाग वेगळा...

नोटबंदी काळात तिने बदलण्यासाठी दिलेल्या नोटा असो, वा कधी भूक लागली तर डब्बे उचकताना तांदुळाच्या, हरभऱ्याच्या व डाळीच्या डब्यात ठेवलेल्या नोटा असो. अशी तिची घरगुती बँक पाहून माझा मेंदू त्या उत्पन्नाचा अंदाज बांधतो. ती पैसे कमवते किंवा सगळं सांभाळून पैसे कमावते याचं कौतुक आहे.

परंतु या सगळ्याच तिची खूप ओढाताण होत असते. आज विविध क्षेत्रातील महिलांसोबत काम करण्याची संधी मिळते, त्यांचा संघर्ष वाचतो, प्रवास ऐकतो, पाहतो तेव्हा एवढंच वाटतं, आई गावात राहून देखील तुझ्या कामाचा संघर्ष खूप मोठा आहे, अशा या माझ्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Similar News