स्त्रीवाद म्हणजे काय?

पुरुषांनी सेक्सवर बोलायचं, मज्जा करायची तशी स्त्रियांनी करायची नसते का? स्त्रीला मन, बुद्धी, मतं, नसतात का? वाचा लेखिका मुग्धा कर्णिक यांचे नवा दृष्टीकोन देणारे विचार

Update: 2020-10-13 05:39 GMT

स्त्री ही शारीरिक भेद सोडल्यास बौद्धिक दृष्ट्या, गरजांच्या दृष्टीनेही पुरुषांसारखीच असते. तिला मन, बुद्धी तशीच आहे. म्हणून मतं आहेत, कर्तृत्व आहे, पंख आहेत. झेप घ्यायची आस आहे. शरीराची गरजही आहे. पुरुषाला जसे आनंद हवे असतात तसेच ते स्त्रीलाही हवे असतात. हे मान्य करणे म्हणजे स्त्रीवाद.

होतं काय, की पुरुषांनी सेक्सवर बोलायचं, मज्जा करायची तशी स्त्रियांनी नाही करायची हे इतकं फिक्स बसलंय. की तसं लिहिणारी स्त्री फार खटकते आणि आपल्या भोवतीच्या स्त्रिया अशाच मोकळ्या झाल्या तर असा धोका भेडसावू लागतो.

मग सत्यअसत्याची ग्वाही सोडून तोंडातलं पाप इथेतिथे थुंकायला सुरुवात होते. हे स्त्रीही पुरुषाइतकीच माणूस आहे हा विचार कृतीत येऊ लागला. तेव्हापासून तो विचार मांडणाऱ्या आणि त्याप्रमाणे जगणाऱ्या, लढणाऱ्या स्त्रिया भोगत आल्या आहेत. गावातल्याही, शहरातल्याही, गरीबीत जन्मलेल्या आणि पिचणाऱ्याही, आणि श्रीमंतीत जन्मलेल्या किंवा लग्न होऊन गेलेल्याही.

लक्षात ठेवा एकदा अन्यायाविरुद्ध ब्र उच्चारत राहण्याचे बळ अंगात आले की, कोणताही 'माणूस' कुठल्याही ठिकाणच्या अन्यायाबद्दल संवेदना बाळगतोच. ते तसे नाही हे दाखवणे. हे हितसंबंधीयांना सोयीचे असते.

मग सुरू होते- एक वेगळी व्हॉटअबौट्री... क्व ते धर्मस्तदा गतः...  ते अमकंच का नाही केलं... ते तमकंच का नाही बोललं... खरा दुखावा, खरी जळजळ काय ते आम्ही समजून चुकलोय...पण आम्ही चांगलंच जगू. आणि जगवू. माणूसपण जपू.  भुक्कडांना विसरा, लेकींनो आणि लेकांनो.


 लेखिका मुग्धा कर्णिक

Tags:    

Similar News