जगणं शिकवणारा मित्र अचानक निगून जातो तेव्हा........

Update: 2022-06-07 12:30 GMT

मैत्री कशाला म्हणावे, त्याची एक सत्यकथा

१९८९ मधील घटना !! तेव्हा मी कॉट बेसिसवर पुण्यातील पेरूगेट जवळच्या अनपट वाड्यात राहत होतो !! संजय कांगणे, मोहन ढोले आदि मित्र तिथलेच !! वाड्यातच आमची एक मेस होती !! त्या मावशी बिलाबाबत कडक होत्या !! आणि एका महिन्यात सात तारखेचा माझा पगार व्हायला वेळ लागला. दोन दिवस तरी मावशीने चालवून घेतले !! पण दहा तारखेपर्यंत भरा नंतर लाड चालणार नाहीत, अशी प्रेमळ नोटीस मिळालेली !! आणि दहा तारखेलाही पगार नाही झाला !! अकरा तारखेला सगळे मित्र मिळून जेवायला निघाले तर मी त्यांना म्हणालो, तुम्ही जा, मला भूक नाही !! संजय कांगणेला थोडा संशय आला !! पण फार काही न बोलता ते सगळे गेले !! मी पाणी पिवून पुस्तक वाचत बसलो !!

तर थोड्याच वेळात मेस मावशीचा मुलगा तीन तळी जेवणाचा डबा घेवून रूमवर आला आणि म्हणाला, "आईने सांगितलेय कि जेवून घ्या, नंतर येवून भेटा"

डब्यातले जेवण झाल्यावर मी मावशीकडे गेलो. तोवर तिथून आमची मित्रमंडळी बाहेर पाय मोकळे करायला गेलेली होती !! मावशी एकट्याच होत्या !! त्या म्हणाल्या, "तुमचे बिल संजय कांगणे याने भरलेय. तेव्हा काळजी करू नका !! तुमचा पगार झाला कि त्याला त्याचे पैसे परत द्या !!"

माझ्या डोळ्यात पाणी !!

रुमवर आलो !! थोड्यावेळाने सगळे मित्र आले !! मी संजयसमोर गेलो आणि त्याच्याकडे निरखून पहिले !! त्याला सगळा संदर्भ लक्षात आला !! हसून तो म्हणाला, "अरे, माझ्याकडे होते जास्तीचे, मी भरले बिल,. त्यात काय इतके ???" आणि पाठीवर थाप मारून "चल आता पान खावू घाल" म्हणून मला घेवून गेला !!

नंतर मी त्याचे पैसे परत केले हा भाग वेगळा !! पण ती वेळ जी त्याने भागवली, त्याची सर परतफेडीला कधीच येणार नाही !!

**

या संजय कांगणे ची अजून एक सवय !! कुणाला पैसे कमी पडत असतील किंवा गरज असेल तर त्याचा स्वाभिमान न दुखावता मदत करायचा !! म्हणजे ज्याला गरज आहे, त्याच्या शर्ट च्या खिशात त्या मित्राच्या नकळत जमेल तसे पैसे ठेवून द्यायचा !! नंतर मित्राने विचारले तर म्हणायचं, होते माझ्याकडे, ते दिले !! तुझ्याकडे आल्यावर परत दे !! हाय काय त्यात

*

काळजाला धक्का देणारी बातमी म्हणजे, काही वर्षांपूर्वी संजय कांगणेचे अपघाती निधन झाले !! घरासमोर शांतपणे उभा होता, आणि समोरून वेड्यावाकड्या वेगाने आलेल्या पल्सर ने त्याला उडवले !! १४ दिवस कोमात होता आणि त्यातच गेला !! चालता बोलता संसार, दोन लहान मुले आणि वहिनी मागे राहिल्या !! स्पिचलेस आहे सगळेच!

असो !

dd class : पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा

हेच खरे ! पण त्याने जे मैत्रीचे विश्व मला जवळून दाखवले तो वसा जमेल तसा पुढे नेतोय. कदाचित "वरून" पाहताना त्याला हे जास्त आवडेल ! तुमच्याही जीवनात कधी असा मदतीचा प्रसंग आला तर समोरच्यांचे मन न दुखावता मदत केली तर ती मदत अधिक सुंदर, त्याचबरोबर आपल्याला अशी मदत कुणी केली असेल तर वेळीच ती परत करावीच त्याचबरोबर आपल्याला कधी संधी मिळाली तर तो वसा आपण पुढे न्यावा!

@ धनंजय देशपांडे

Tags:    

Similar News