अमृताच्या मुखातून पडलेले हे शब्द आम्हाला आवडले नाही बेटा... अमृता फडणवीस यांना पत्राद्वारे सल्ला!

मंगळवारी अमृता फडणवीस यांनी पत्रकार परीषदेत नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला होता. मलिकांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली होती. त्यांच्या या अनिर्बंध वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधकांना तर राग आलाच परंतू त्यांच्या चाहत्यांनादेखील या गोष्टीचे वाईट वाटले आहे. शेखर पासेकर यांनी अमृता फडणवीस यांना वडीलकीच्या नात्याने सल्ला देणारं पत्र लिह्लं आहे. वाचा शेखप पासेकर यांनी लिहेलेलं पत्र....

Update: 2021-11-04 05:42 GMT

प्रिय अमृता,

पत्र लिहिण्यास कारण की तुझ्या वयाची मला मुलगी आहे, पुतणी आहे, सून आहे. तू पण माझी मानलेली मुलगी आहेस. माझ्या कुटूंबातील सदस्य आहेस. असे समजून दोन शब्द तुला लिहितोय. तू फक्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी नाहीयेस. तूझी अजून एक ओळख आहे, तू बँकर आहेस, समाजसेविका आहेस आणि बऱ्यापैकी सूर ताल लय यांची जाण असणारी गायिका आहेस. तुझे माझे राजकीय विचार जुळत नसले तरी तुझा समाजमाध्यमांवरचा सहज सुंदर वावर मला आवडतो. तुझी वेशभूषा, केशभूषा, तुझी आवड-निवड आणि तुझ्याकडे असलेली सवड यांचा मेळ जमवून तुझे व्यक्त होणे मी कधीच चुकवत नाही. तुझे नवे गाणे मी ऐकतोच. गणेशोत्सवात तुझे कुटुंबासमवेतील पूजा-पाठ, तुझं खास जपलेले मराठी पण मी आवडीने पाहतो.

राजकारण वेगळे असते बेटा! आजचा मुख्यमंत्री उद्या नसणार... कालचा परत उद्या मुख्यमंत्री होईल. कदाचित तू सुद्धा भविष्यात त्या पदावर विराजमान होशील आणि त्यासाठी आमच्या तुला शुभेच्छा असतीलच, पण व्यक्त होताना जरा सांभाळ स्वतःला. काल पत्रकार परिषदेत तू रागाने, संतापात किंवा अनावधानाने "आम्ही पण चढणार" या शेलक्या शब्दात व्यक्त झालीस. हा शब्द ऐकून मीच नाही तर माझ्या सारखे बरेच जण व्यथित झालेत. विरोधकांचा समाचार घे. तो तुझा हक्क अबाधित आहे किंबहुना आपल्या जोडीदाराचे कोणी उणे दुणे काढत असेल तर तू पाठराखण करायलाच हवी. पण हे काय? शब्दांचा भावार्थ आणि मतितार्थ याचे भान ठेव. तुझे वाचन भरपूर असेल तर अतिशय मोजक्या अणकुचीदार आणि धारधार शब्दात समोरच्याचे किंवा विरोधकांची लक्तरं काढू शकतेस. ती काढायलाच हवीत.

खरे तर सप्तसुरांची सवय असलेल्या तुझ्या गळ्यातून हे शब्द बाहेर पडलेच कसे? मी निक्षून सांगतो अमृता हे संस्कार तुझे नाहीत आणि तू ही तशी नाहीयेस. अशी अनिर्बंध वाहत जाऊ नको बेटा... समाजमाध्यमात रोज गरळ ओकणाऱ्या महिलांच्या पंगतीत तुला बसलेले बघून तुला हे पत्र लिहायला घेतले. नेहमी पैठणी घालणाऱ्या तुझ्या सारख्या रुपगर्वीतेला फाटक्या लुगड्यात बघायची सवय आम्हाला लावू नको. दुसरं कोणी या प्रकारे व्यक्त झाले असते तर मी कदाचित दुर्लक्ष केले असते पण अमृताच्या मुखातून पडलेले हे शब्द आम्हाला आवडले नाही बेटा...

सुखी राहा ,निरोगी राहा ,आनंदी राहा.

शेखर पासेकर.

Spasekar65@gmail.com

Tags:    

Similar News