संक्रांत, संक्रमण अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं

Update: 2022-01-15 10:33 GMT

अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची ओढ कायमच मानवाला वाटत आलीय. भोवताली दाटलेल्या अंधारातून मानव प्राण्याने प्रकाशाची वाट सभोवतालला दाखवली आणि सुरू झाला अखिल जीवसृष्टीचा प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास. सूर्यास्तानंतर काळोखात गपगार होणारी पृथ्वी प्रकाशाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असायची. तिच्या अंगाखांद्यावर वाढलेल्या मानवप्राण्याने अग्नीच्या शोधाबरोबर एक संस्कृती उदयाला आणली जी प्रकाशवाटा बनली.

कालांतराने ह्या प्रकाशवाटांवर चालता चालता हाच मानवप्राणी उन्मत्त झाला. सृष्टीला झुगारुन देऊ लागला. फक्त मानवी पर्यावरणाचा विचार करु लागला. भवताल विसरला. आणि सुरू झाला एक प्रवास विनाशाचा. पृथ्वीच्या विनाशाचा. आणि या विनाशात हात होता तो  फक्त माणूस प्राण्याचा. या विनाशात बळी जातेय जीवसृष्टी. दाट काळोख दाटलाय पण यातून वाट दाखवतेय ग्रेटा सारखी एक १६ वर्षाची मुलगी, जी प्रकाशकिरण घेऊन आलेय या विनाशाला रोखायला!!

आज आपल्या देशातही जात धर्माच्या नावावर चाललेले ध्रुवीकरण माणसाला माणूस ह्या एकाच जातीनुसार जगायला देत नाही. सर्वत्र अंधकार गडद होतोय. ज्ञान लोपत चाललय की काय अशी भिती वाटतेय. ज्ञानाबरोबरच भाषा, संस्कृती सगळंच लयाला चाललय. मानव्य लुप्त होतय आणि जाती धर्माच्या नावाखाली सत्तेचा अमानवी खेळ सुरू आहे. परस्पर विश्वास, प्रेम संपवण्यात सत्ताधा-यांना यश आलय आणि देश अराजकतेकडे लोटला गेलाय. सत्तेबरोबर आलेली झुंडशाही वाढलीय आणि अर्थकारण व समाजकारणाला राजकारणाने मातीत मिळवलय. लोकशाही धोक्यात आलीय आणि देश हुकुमशाहीचं स्वागत करतोय की काय असं वाटायला लागलय.

आणि अशा परिस्थितीत तरुणाईच्या रुपानं एक प्रकाशाचा किरण दिसू लागला.  संविधानावर चालणारा आपला देश हा सध्या राज्यकर्त्यांकडून घेतल्या जाणाऱ्या अनेक असंविधानिक निर्णयांत भरडला जाताना दिसतोय. या निर्णयांचा संविधानिक मार्गांनी विरोधही केला जाताना दिसतोय. खूप मोठ्या संख्येने तरुणाई रस्त्यावर उतरली. अशातच जामिया मिलिया व जेएनयु विद्यापिठांत पोलिसांकडून व पोलिस पुरस्कृत गुंडांकडून तरुणांचा आवाज दाबण्याचा पुरेपुर प्रयत्न करण्यात आला. पण त्यामुळे ही तरुणाई जास्तच सक्रीय झाली. संविधानिक मार्गाने अहिंसकपणे ही तरुणाई रस्त्यावर उतरली.

तिरंगा हातात घेऊन संविधानाच्या प्रास्ताविकेचं चौकाचौकात वाचन करणारी तरुणाई आणि त्यांना साथ देणारा कष्टकरी बहुजन व अल्पसंख्यांक समाज, शाहिन बागेत ठिय्या मारुन बसलेल्या महिला, हे सर्वजण हा दाट काळोख भेदण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतानाच सगळया विश्वालाच करोनाने काळाकुट्ट विळखा घातला. जीवाच्या भयाने आणि पोटातल्या भुकेने कष्टकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे चालत राहिले. आंदोलनात सक्रिय असलेले सर्वजण या जथ्थ्यांच्या पोटातली आग शमवण्यासाठी धावले. या सर्वांपासून कोसो दूर असलेलं सरकार काळे कायदे पारित करतं झालं आणि करोनामुळे थंडावलेली आंदोलनांतली धग शेतकरी आंदोलनातून परत धगधगायला लागली. सत्याची, अन्यायाविरुध्दच्या एकजूटीची धग सगळीकडे पसरायला लागली. देशभरातून या आंदोलनात सामिल झालेल्या सर्वांनी हा दाट काळोख भेदण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि या सत्याग्रहापुढे सरकारला झुकावेच लागले.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होताहेत. पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे संक्रमित झालेल्यालाही आता पाऊण शतक लोटलय. मध्यरात्री नियतीबरोबर केलेल्या त्या करारानुसार अनेक गोष्टी आपण देशवासियांनी मिळवल्यात, काही अजून बाकी आहेत. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीचा जल्लोश करावा असं वातावरण मुद्दामच नाकारलं जातय. खरंतर संविधान हातात घेऊनच हा जल्लोश करायला हवा. पण धर्मसंसदा भरवून खुलेआम संविधान नाकारलं जातय. आजादीच्या रस्त्यावर चालणाऱ्या देशवासियांना एका काळ्याकुट्ट अंधारात ढकलण्याचा प्रयत्न होतोय.

पण हे असे असले तरी मला खात्री आहे या अंधःकारात दडलेला आहे प्रकाश, जो होत जाईल हळूहळू मोकळा!! अंधाराचे जाळे हळूहळू विरळ होत जाईल आणि समतेची प्रकाशवाट प्रशस्त होईल. ही सकारात्मकता जाणवून लेखकांची झरतेय लेखणी आणि चित्रकार चितारताय चित्र, कवी लिहिताहेत कविता, कलाकार साकारताहेत कलाकृती, अंधःकाराच्या आणि हो, संक्रमणाच्यासुध्दा!

तिमिरातून तेजाकडे जातानाचे साक्षीदार असणार आहोत आपण सर्वचजण. म्हणूनच थोडा जोर आता लावावाच लागेल. वर्षानुवर्ष रुजवलेल्या प्रकाशबीजांचा उजेड आता दिशादर्शक बनू पाहतोय. काल लोहरीच्या ज्वाळांत सत्याच्या, एकजूटीच्या प्रकाशवाटा उजळताना दिसल्या असतीलच. या प्रकाशवाटा संक्रमण काळात अशाच उजळवत ठेवुया. सत्याचा आग्रह धरत संवादी राहुया. संक्रांतीच्या निमित्ताने ही सृष्टी ऋतुबदलासाठी तयार झालीय.  सकल मानव जात मानव्यात संक्रमित होण्यासाठी ह्या ऋतूबदलात आपलेही योगदान असायलाचं हवं, हीच ऋतूबदलाच्या या उत्सवानिमित्त मनापासून सदिच्छा!!

सिरत सातपुते

१४ जानेवारी २०२२

Tags:    

Similar News