'ऑपरेशन सिंदूर' ची संपूर्ण जगाला माहिती सांगितली ती भारतीय सैन्यादलातील सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांनी. त्यानंतर या दोघी चर्चेत आल्या. इतक्या मोठ्या कारवाईची माहिती सांगण्यासाठी भारतीय सैन्यानं या दोन महिला अधिकाऱ्यांची निवड करत एक वेगळा संदेश दिलाय.
कर्नल सोफिया कुरेशी. मुळच्या गुजरातच्या. कुरेशी कुटुंबाला देशसेवेची परंपरा आहे. सोफिया यांचे आजोबा, वडील भारतीय सैन्यात होते. त्यामुळं सोफिया या देखील १९९९ मध्ये देशसेवेसाठी भारतीय सैन्याच्या सिग्नल कॉर्प्समध्ये भरती झाल्या. त्यानंतर २०१६ मध्ये बहुराष्ट्रीय लष्करी सरावात त्यांनी भारताचं नेतृत्व करत अचानक चर्चेत आल्या. कारण अशी कामगिरी करणाऱ्या त्या एकमेव महिला अधिकारी होत्या. विशेष म्हणजे भारताकडून या सरावाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये परदेशी सैन्यांचा अभ्यास करण्यात आला होता. यात सहभागी झालेल्या १८ देशांच्या सैन्य दलात कर्नल सोफिया या एकमेव महिला कर्नल होत्या.
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मिरच्या पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यानंतर ७ मे २०२५ रोजी भारतीय सैन्यानं पहाटे १ ते दीड वाजे दरम्यान ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. यामध्ये पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळं उध्वस्त केली. या सगळ्या ‘ऑपरेशन सिंदूर’ ची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांनी दिली.
कर्नल सोफिया यांचा जन्म १९८१ मध्ये गुजरातच्या वडोदरा इथं लष्करी कुटुंबात झाला. सोफिया यांनी १९९७ मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातून जैविक रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादित केली. त्यानंतर १९९९ मध्ये त्या भारतीय सैन्यात भरतीय झाल्या. त्यानंतर चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीतून त्यांनी प्रशिक्षण घेतलं. कर्नल सोफिया यांच्या आजोबांनीही सैन्यात सेवा केलेली आहे. सोफिया यांचा विवाह सैन्यातल्याच मैकेनाइज्ड इन्फेंट्री मध्ये अधिकारी असलेल्या ताजुद्दीन कुरैशी यांच्यासोबत झाला.
ऑपरेशन पराक्रम
डिसेंबर २००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर पंजाब सीमेवर ऑपरेशन पराक्रम राबविण्यात आलं. यामध्ये कर्नल सोफिया कुरैशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यासाठी त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (जीओसी-इन-सी) कडून प्रशस्तिपत्र मिळालं.
युद्धभूमीव्यतिरिक्तही कर्नल सोफिया यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांतता मोहीमांचा एक भाग म्हणून २००६ ते २०१२ पर्यंत सहा वर्षे सैन्य पर्यवेक्षक म्हणून सेवा बजावलीय.
ईशान्य भारतातील पूरग्रस्तांच्या बचावकार्यातही कर्नल सोफिया यांनी अतुलनीय पराक्रमाचा परिचय दिला. त्याची दखल घेत सिग्नल ऑफिसर-इन-चीफ (एसओ-इन-सी) कडूनही त्यांना गौरविण्यात आलं होतं.