"मी पोलिसांना घाबरत नाही!" हे वाक्यचं महिला सुरक्षिततेचं अपयश, उबर चालक महिलांवर गेला धावून

"I'm not afraid of the police!" This sentence is a failure of women's safety, Uber driver runs over women

Update: 2025-09-28 14:18 GMT

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक उबर कॅब चालक महिलांशी अत्यंत उद्धट आणि आक्रमक वर्तन करताना दिसतो. “मी पोलिसांना घाबरत नाही, जेलमध्ये गेलो तरी चालेल, पण मी तुम्हाला मारेन...” असे म्हणत पाईप घेऊन त्या महिलांच्या अंगावर धावून जाणाऱ्या चालकाचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर संतापाची लाट उसळवतो आहे.

ही घटना नोएडामधील आहे आणि पुन्हा एकदा देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

*घटना कशी घडली?*

५ महिला प्रवासी बोटॅनिकल गार्डन मेट्रो स्टेशनहून सेक्टर १२८ येथे जाण्यासाठी उबर कॅबने प्रवास करत होत्या. कार्यालयात उशीर होऊ नये म्हणून त्यांनी ड्रायव्हरला दुसऱ्या मार्गाने गाडी वळवण्याची विनंती केली. परंतु चालकाने यावर संताप व्यक्त केला, त्यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्यावर आरडाओरड सुरू केली.

जेव्हा महिलांनी त्याला पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली, तेव्हा तो आणखीच संतापला आणि म्हणाला "जिथे तक्रार करायची आहे तिथे करा, मी पोलिसांना घाबरत नाही."पुढे तो गाडीच्या डिकीतून एक लोखंडी पाईप काढून थेट महिलांवर चालून गेला. त्याच्या या धोकादायक वर्तनामुळे महिलांची मानसिक अवस्था ढासळली.

महिलांवरील वाढता धोका याकडे किती काळ दुर्लक्ष ?

ही घटना केवळ एक अपवाद नाही. सार्वजनिक किंवा खासगी वाहनांतून प्रवास करणाऱ्या अनेक महिलांना दररोज शाब्दिक त्रास, धमक्या, अवमान, किंवा कधी-कधी थेट शारीरिक हल्ल्याचा धोका पत्करावा लागतो.

प्रश्न असा आहे की, महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी तक्रार करायचा प्रयत्न केला तरी त्यांच्या विरोधातच राग व्यक्त केला जातो? कायदा आणि सुव्यवस्थेवर इतका अविश्वास का दिसतो आहे?

उबरकडून प्रतिक्रिया पण एवढं पुरेसं आहे का?

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उबर कंपनीने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणात चालकाविरुद्ध योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. कंपनीने जाहीर केलं की, "ग्राहकांची सुरक्षितता हेच आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. अशा प्रकारच्या वर्तनाला आम्ही कधीही प्रोत्साहन देत नाही."

त्यांनी संबंधित महिलांना नुकसानभरपाई देण्याचंही आश्वासन दिलं आहे. मात्र या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कंपनी आणि प्रशासनाकडून सखोल चौकशी, ड्रायव्हर स्क्रिनिंग, आणि तत्काळ प्रतिसाद यंत्रणा यांची गरज आहे.

या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, महिलांसाठी "सुरक्षित प्रवास"ही अजूनही एक अपेक्षा आहे, वास्तव नाही. "मी पोलिसांना घाबरत नाही..." असे खुलेआम म्हणणारा एक चालक जर अशा प्रकारे वागत असेल, तर हा केवळ त्या महिलांचा नाही, तर संपूर्ण समाजाचा अपमान आहे.


Tags:    

Similar News