नेस्लेच्या 'बेबी प्रॉडक्ट'मध्ये आढळले घातक विषारी घटक; २५ हून अधिक देशांतून माल परत मागवला!
जगातील आघाडीची अन्न उत्पादक कंपनी असलेल्या 'नेस्ले'ने (Nestle) त्यांच्या 'इन्फंट न्यूट्रिशन' म्हणजेच लहान मुलांच्या दूध आणि आहाराच्या काही बॅचेस जागतिक स्तरावर परत मागवण्याचा (Recall) मोठा निर्णय घेतला आहे. उत्पादनांमध्ये 'सेरुलॉइड' (Cereulide) नावाचे अत्यंत घातक विषारी घटक असण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीने हे पाऊल उचलले आहे. २५ पेक्षा जास्त देशांमधील विक्रीवर याचा मोठा परिणाम झाला असून नेस्लेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रिकॉल असल्याचे मानले जात आहे.
नेमका धोका काय? नेस्लेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'अराकिडोनिक ॲसिड ऑइल' (Arachidonic Acid Oil) या घटकात पुरवठादाराकडून झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे दूषित अंश मिसळले असण्याची शक्यता आहे. या ऑइलमध्ये 'बॅसिलस सेरियस' (Bacillus cereus) या बॅक्टेरियापासून तयार होणारा 'सेरुलॉइड' हा विषारी घटक आढळला आहे. विशेष म्हणजे, हा विषारी घटक अत्यंत 'उष्णतारोधक' (Heat-stable) असून, उकळत्या पाण्याने किंवा दूध तयार करताना गरम केल्यानेही तो नष्ट होत नाही, असा इशारा ब्रिटनच्या 'फूड स्टँडर्ड्स एजन्सी'ने (FSA) दिला आहे.
लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम: या विषारी घटकाचे सेवन केल्यास लहान मुलांमध्ये मळमळ, उलट्या, तीव्र पोटदुखी आणि अतिसार (Diarrhea) यांसारखी लक्षणे अवघ्या ३० मिनिटे ते ६ तासांत दिसून येऊ शकतात. सुदैवाने, आतापर्यंत या उत्पादनांमुळे कोणत्याही बालकाला बाधा झाल्याचे अधिकृत वृत्त नाही; मात्र कंपनीने पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
कोणते ब्रँड्स आहेत रडारवर? या 'महा-रिकॉल'मध्ये नेस्लेचे प्रामुख्याने SMA, BEBA आणि NAN (NAN Optipro, NAN Comfort इ.) हे लोकप्रिय ब्रँड्स समाविष्ट आहेत. युरोपातील ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया यांसह सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना, तुर्की, ब्राझील आणि चीन यांसारख्या ३७ हून अधिक बाजारपेठांवर याचा परिणाम झाला आहे.
ग्राहकांसाठी सूचना: कंपनीने पालकांना त्यांच्याकडील उत्पादनाच्या डब्यावरील 'बॅच कोड' (Batch Code) अधिकृत संकेतस्थळावर तपासावा, असे सुचवले आहे. जर तुमचे उत्पादन रिकॉल केलेल्या यादीत असेल, तर त्याचा वापर तातडीने थांबवावा. अशा ग्राहकांना कंपनीकडून पूर्ण परतावा (Refund) दिला जाणार असून, संशयित उत्पादन परत करण्यासाठी विशेष हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.