अरे बापरे! बायकाच म्हणत्यात नवऱ्यानं मारलं तर काय झालं?

"तुमच्या मते, पतीने पत्नीला मारणे किंवा मारहाण करणे योग्य आहे का...," या प्रश्नावर तब्बल 18 राज्यांमधील महिलांनी सकारात्मक उत्तर दिलं आहे.

Update: 2021-12-02 08:17 GMT

  घटता प्रजनन दर आणि महिलांच्या बँक खात्यांची वाढ त्यांच्या वाढत्या सक्षमीकरणाकचं प्रतिक आहे. परंतु जेव्हा घरगुती हिंसाचाराच्या संदर्भात महिलांच्या दृष्टीकोनाचा विषय येतो तेव्हा राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (National Family Health Survey) एका महत्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवतं.

"तुमच्या मते, पतीने पत्नीला मारणे किंवा मारहाण करणे योग्य आहे का...," या प्रश्नावर NFHS-5 ने २०१९-२१ मध्ये देशातील तब्बल १८ राज्ये आणि जम्मू-काश्मीरमध्ये सर्व्हे केला.

सर्व्हे केलेल्या महिलांपैकी 83.8 टक्के महिलांनी तेलंगणात पुरुषांनी त्यांच्या पत्नीला मारहाण करणे योग्य आहे असे म्हटले आहे. हेच प्रमाण हिमाचल प्रदेशात सर्वात कमी म्हणजे 14.8 टक्के नोंदवले गेले. या प्रश्नाबाबत पुरूषांच्या मतांचा विचार केल्यास, कर्नाटकमधील 81.9 टक्के तर हिमाचल प्रदेशात 14.2 टक्के ही मारहाण योग्य असल्याचे म्हटले आहे.

सर्वेक्षणाने प्रश्नाच्या उत्तरादाखल पत्नीला मारण्याचे किंवा मारहाण करण्याचे कारण म्हणून काही पर्याय दिले ते असे - १.जर ती त्याला न सांगता बाहेर गेली २. जर तिने घराकडे किंवा मुलांकडे दुर्लक्ष केले ३.जर तिने त्याच्याशी वाद घातला ४. जर तिने त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला ५. जर तिने अन्न योग्य प्रकारे शिजवले नाही ६. जर त्याला तिच्यावर विश्वासघातकी असल्याचा संशय असेल ७. जर तिने सासरच्या लोकांचा अनादर केला.

सर्वेक्षणानुसार, घरगुती अत्याचाराचे समर्थन करण्यासाठी सासरच्या लोकांचा अनादर करणे तसेच घर आणि मुलांकडे दुर्लक्ष करणे ही दोन कारणे सर्वाधिक वेळा निवडली गेली.

2019-21 या काळात हा सर्व्हे महाराष्ट्र, आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये घेण्यात आला.

महिलांनी कौटुंबिक हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश (८३.६ टक्के), कर्नाटक (७६.९ टक्के), मणिपूर (६५.९ टक्के) आणि केरळ (५२.४ टक्के) ही राज्ये आघाडीवर आहेत. तर हिमाचल प्रदेश आणि त्रिपुरा या दोन राज्यांमधील पुरुषांनी घरगुती अत्याचाराचं सर्वात कमी म्हणजे अनुक्रमे 14.2 आणि 21.3 टक्के असं समर्थन केलं

NFHS-4 (2015-2016) च्या संपूर्ण देशासाठी जानेवारी 2018 मध्ये जारी करण्यात आलेल्या डेटामध्ये असे म्हटले आहे की सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 52 टक्के महिलांनी नवऱ्याने बायकोला मारहाण करणे योग्य असल्याचे मानले, तर केवळ 42 टक्के पुरुषांनी याला सहमती दर्शवली होती.

ताज्या सर्वेक्षणात, 18 राज्यांपैकी 13 राज्यांतील म्हणजेच मणिपूर, गुजरात, नागालँड, गोवा, बिहार, आसाम, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, नागालँड, हिमाचल प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगालमधील महिलांनी या मारहाणीचं समर्थन करताना 'सासरचा अनादर' हे मुख्य कारण निवडलं. तर 'घर आणि मुलांकडे दुर्लक्ष करणे' हे दुसरं महत्वाचं कारण सर्वाधिक वेळा निवडलं गेलं. 'अविश्वासू असल्याचा संशय असल्याने' मारहाणीचे प्रमाण सर्वात कमी आहे. हे कारण फक्त मिझोराम राज्यातील स्त्रिया (21%) इतर दोन पर्यायांपेक्षा शारीरिक शोषणाचे मुख्य कारण म्हणून निवडतात.

महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या पॉप्युलेशन फर्स्ट या स्वयंसेवी संस्थेच्या संचालिका शारदा ए एल म्हणाल्या: "आपल्या कुटुंबाची आणि पतीची सेवा करणे हे आपले पहिले प्राधान्य असावे असे मानणाऱ्या स्त्रियांच्या मनात या प्रकारची पितृसत्ताक मानसिकता खोलवर रुजलेली आहे."

Tags:    

Similar News