ओमिक्रॉनचे सावट गडद ; राज्यात पुन्हा निर्बंध...

Update: 2021-12-24 07:03 GMT

महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनचे सावट गडद झाले असून, राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार आज, शुक्रवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार असून, याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.

मागील २४ तासांमध्ये मुंबईतील ६०२ जणांसह राज्यभरात ११७९ कोरोनाबाधित आढळलेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री कोरोना तज्ज्ञ गटाशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. त्यात दिल्लीच्या धर्तीवर निर्बंध लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार, आजपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार आहे, तसेच धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी कमी करण्यासोबतच नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवर बंदीची शक्यता आहे.

आज सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री पुन्हा कोरोना कृतीदलाशी आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर दुपारी राज्यात नवे निर्बंध लागू करण्याची घोषणा करण्यात येईल. या निर्बंधांनंतर आठवडाभर परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून परिस्थितीनुसार निर्बंध कठोर करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

तर दुसरीकडे, कोरोना रुग्णसंख्येमध्ये दुसऱ्या दिवशीही वाढ नोंदविण्यात आली. राज्यात गुरुवारी कोरोनाचे ११७९ रुग्ण आढळलेत. त्यात मुंबईतील रुग्णवाढ लक्षणीय आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ६०२ रुग्ण आढळलेत. दैनंदिन रुग्णसंख्येतील हा दोन महिन्यांतील उच्चांक होता. राज्याच्या अन्य भागामध्ये अजून तरी तेवढी रुग्णसंख्या वाढ झालेली नाही. दिवसभरात पुणे जिल्हा १८४, नगर ४४, मराठवाडा २७, विदर्भ १८ नवे रुग्ण आढळलेत.

नाताळ आणि नववर्ष कार्यक्रमांवर ओमिक्रॉनचे सावट आहे. ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याबाबत विचार करा, अशी सूचना केंद्र सरकारने गुरुवारी राज्यांना केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती बांधवांनी नाताळचा सण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन करत राज्याच्या गृहविभागाने केले आहे. सोबतच चर्चमध्ये क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत उपस्थितीला परवानगी दिली आहे.

Tags:    

Similar News