पोस्टपार्टम डिप्रेशन: अजूनही टॅबू का?
मातृत्वाच्या आनंदामागे दडलेली वेदना समाजाला का दिसत नाही?
बाळ होणं म्हणजे आनंद, समृद्धी आणि उत्सवांचं प्रतिक मानलं जातं. एका नव्या जीवाच्या आगमनाने कुटुंब उजळून निघतं, घरात आनंदाचं चैतन्य भरतं. या सर्व उत्साहाच्या मध्यभागी एक व्यक्ती मात्र शांतपणे, स्वतःच्या मनाशी एक खोल लढाई लढत असते ती म्हणजे आई. समाजाच्या नजरेत ती काळजी घेणारी, प्रेमाची मूर्ती, सदैव हसणारी, बाळाला बिलगलेली असते. पण या बाह्य प्रतिमेमागे अनेक महिलांच्या मनात भीती, एकटेपणा, अस्थिरता यांची वादळे उसळत असतात.
आणि याचं नाव म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन आणि दुर्दैवाने हा आजही टॅबू आहे.
पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे नेमकं काय? बाळ झाल्यानंतर महिलांच्या शरीरात आणि मनात अनेक बदल होतात हॉर्मोन्सचा तीव्र उतारचढाव, झोप कमी होणं, नव्या जबाबदाऱ्या, प्रसूतीच्या वेदनांचा परिणाम, आणि नव्या भूमिकेचा दडपण या सगळ्यामुळे काही दिवस हलकी उदासीनता येणं सामान्य आहे. याला “बेबी ब्ल्यूज” म्हणतात. पण ही उदासी दोन आठवड्यांपेक्षा जास्त टिकली, तीव्र झाली किंवा महिलेला स्वतःविषयी किंवा बाळाविषयी प्रेम वाटेनासं झालं, अपराधीपणा वाढू लागला, ती स्वतःला सक्षम समजेनाशी झाली तर ते पोस्टपार्टम डिप्रेशनचे लक्षण आहे.
शास्त्रीयदृष्ट्या हा एक गंभीर, उपचारयोग्य मानसिक आरोग्याचा विकार आहे. पण भारतीय समाजात ते आजही "कमजोरी", "खोटेपणा", "अतिसंवेदनशीलता" किंवा “मातृत्वाचा अपमान” म्हणून पाहिले जाते. हेच ते टॅबूचे मूळ.
आपल्या समाजात मातृत्वाला देवपण दिलं गेलं आहे. आई सर्वकाही सहन करते, आई कधी थकत नाही, तिला भीती नसते, ती अपार प्रेमाची मूर्ती असते या कल्पना इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत की आईला उदास वाटणं, रडू येणं, किंवा स्वतःला एकटं समजण आणि असहाय वाटणं लोकांच्या मानसिक चौकटीत बसतच नाही. म्हणून जेव्हा ही नवीन आई तिच्या भावना व्यक्त करते की -
“मला कसंतरी होतंय.”
“मला झोप येत नाही.”
“इतक्या बदलांना सामोरं जाणं जमत नाहीये.”
“मला बाळाशी कनेक्ट व्हायला वेळ लागतोय.”
तेव्हा तिच्याकडे समजून घेण्यापेक्षा विस्मयाने किंवा नाराजीने पाहिले जाते.
“काय बाई, एवढ्या छोट्या गोष्टीवर रडतेस?”
“मातृत्व म्हणजेच त्याग. सगळ्या स्त्रिया करतात.”
“तूच जरा ड्रामेबाज झाली आहेस.”
“बाळ हवं म्हणून झालीस ना आई? आता निभावून घे.”
या वाक्यांनी तिचं मन आणखी तुटतं, डिप्रेशन अधिक खोल जातं.
पोस्टपार्टम काळातील एक मोठी समस्या म्हणजे आईला स्वतःसाठी वेळ नसतो. शरीर प्रसूतीनंतर कमजोर असतं, झोपेचा त्रास, दूधपुरवठ्याचा ताण, कुटुंबाच्या अपेक्षा, पाहुण्यांची वर्दळ या सगळ्यामुळे ती स्वतःच्या मानसिक आरोग्याचं निरीक्षण करू शकत नाही. तिच्या मनातली उदासी अनेकदा "थकवा" म्हणून बाजूला सारली जाते.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला आपण “वाईट आई असल्याची” भीती वाटते.
ती विचार करते—
“मी आनंदी का नाही?”
“माझ्यातच काहीतरी चुकीचंच असेल.”
ही भीती इतकी तीव्र असते की ती स्वतःच्या भावना कुणाशी बोलायलाही घाबरते, कारण तिला समाजापासून एकच गोष्ट मिळते ती म्हणजे निर्ढावलेली तुलना आणि कठोर न्याय.
ग्रामीण भागात परिस्थिती आणखी कठीण आहे. तिथं प्रसूतीनंतर महिलांना विश्रांतीपेक्षा कामात ढकललं जातं. लोकांचं ज्ञान किंवा मानसिक आरोग्याविषयीची जागरूकता कमी असते. अनेक ठिकाणी डिप्रेशनला “भूतबाधा”, “काळा प्रभाव”, “कमकुवत मन” अशा अंधश्रद्धांत गोंधळून टाकलं जातं. परिणामतः योग्य उपचार मिळत नाहीत.
पण लक्षात घ्या पोस्टपार्टम डिप्रेशन फक्त आईलाच होतं असं नाही. बाळाची काळजी घेताना, नवीन जीवनाशी जुळवून घेताना ज्या ताणांचा सामना आई करते, त्याचा परिणाम तिच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. नवजात शिशुच्या विकासावरही त्याचा परिणाम होऊ शकतो भावनिक जोडणीत विलंब, स्तनपानातील समस्या, किंवा बालकाच्या मानसिक विकासात काही प्रमाणात प्रभाव पडू शकतो. म्हणूनच या विषयाला केवळ “आईची वैयक्तिक समस्या” म्हणून न पाहता, “कुटुंब आणि समाजाची सामूहिक जबाबदारी” म्हणून पाहणे आवश्यक आहे.
आजच्या काळात पोस्टपार्टम डिप्रेशनवर प्रभावी उपचार, समुपदेशन, औषधोपचार, सपोर्ट ग्रुप्स आणि अनेक मार्ग उपलब्ध आहेत. पण त्यांच्याकडे पोहोचण्यासाठी सर्वात आधी एक गोष्ट बदलली पाहिजे—समाजाचा दृष्टीकोन. मातृत्वाला केवळ पवित्र, आनंदी आणि सहज प्रवास म्हणून मांडण्याऐवजी, त्याच्या काळोख्या, त्रासदायक आणि गुंतागुंतीच्या बाजूंनाही मान्यता दिली पाहिजे.
नवीन आई हसत नाही, खुश दिसत नाही म्हणून ती वाईट आई होत नाही. तिला जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो म्हणून ती कमी पडत नाही. तिचा थकवा, तिची उदासी, तिचं रडणं हे कमकुवतपणाचं नव्हे तर शरीरातील आणि मनातील बदलांचे संकेत आहेत.
हे टॅबू तोडणं म्हणजे तिच्या भावनांना “नाव” देणं. तिला सांगणं की—
“तू एकटी नाहीस.”
“ही तुझी चूक नाही.”
“तुझं मानसिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे.”
“यावर उपचार आहेत.”
आज गरज आहे महिलांनी स्वतःच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याची, कुटुंबांनी त्यांना समजून घेण्याची आणि समाजाने मातृत्वाच्या प्रतिमेला वास्तववादी बनवण्याची.
पोस्टपार्टम डिप्रेशन हा टॅबू नाही; तो महिलांच्या मनावरचा ताण आहे.
तो लपवण्याचा विषय नाही; तो उपचार करण्याचा आणि बोलण्याचा विषय आहे.
आणि नवजात बाळाप्रमाणेच मातेलाही प्रेम, काळजी आणि समजूतदारपणाची गरज आहे, कदाचित त्याहूनही अधिक आहे.