“समाजाला सुंदर मुलगी + देखणा मुलगा हीच जोडी का हवी?”

सूरज–संजनाने सगळी समीकरणं बदलली!

Update: 2025-12-02 12:18 GMT

भारतीय समाजातील सौंदर्यधारणा ही फक्त दिसण्याची गोष्ट नाही, तर एक खोलवर रुजलेला सांस्कृतिक आणि मानसिक ढाचा आहे. शतकानुशतकं सौंदर्याची व्याख्या “गोरा गोरा रंग, सडपातळ शरीरयष्टी, विशिष्ट चेहरेपट्टी, आणि ‘फोटोजेनिक’ फॉर्ममध्ये बसणारे रूप” अशा निकषांवर आधारित राहिली. या व्याख्येमुळे व्यक्तिमत्त्व, नैतिक मूल्यं, बुद्धिमत्ता, सौजन्य—या सर्वांना दुय्यम स्थान दिलं गेलं; आणि ‘दिसणं’ हे व्यक्तीच्या संपूर्ण मूल्यांकनाचा पाया बनलं. हा ढाचा अजूनही बदलला नसल्याचं सर्वात स्पष्ट प्रतिबिंब सोशल मीडियावर दिसतं.

अलीकडेच bigboss मराठी विनर सूरज आणि संजना यांच्या लग्नाचे व्हिडिओ इंटरनेटवर पसरले आणि त्यांच्याबद्दल येणाऱ्या कमेंट्सनी ही सौंदर्यधारणा किती विषारी आणि एकसुरी आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलं. संजना सुंदर, तर सूरज दिसायला साधा, सामान्य. दोघांची जोडी पाहून अनेकांनी कौतुक केले, पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात लोकांनी त्यांच्या नात्यावर शंका उपस्थित केल्या—“तिला यात काय दिसलं असेल?”, “तो खूप लकी आहे!”, “जोडीच जमत नाही.” या प्रतिक्रिया केवळ टोमणे नाहीत, तर समाजाच्या असलेल्या सौंदर्यसत्तेचं प्रतिबिंब आहेत.

समाजाची समस्या अशी की सौंदर्याला त्यांनी केवळ दृश्य वैशिष्ट्य नव्हे, तर ‘मूल्य’ बनवून ठेवले आहे. सुंदर व्यक्ती म्हणजे प्रतिष्ठा आणि तिचा जोडीदार तिच्या समतुल्य दिसणारा असावा ही अपेक्षा अजूनही जिवंत आहे. म्हणूनच सुंदर मुलगी एखाद्या साध्या दिसणाऱ्या मुलासोबत दिसली की त्या दोघांनी केलेली निवड स्वीकारण्याऐवजी लोक स्वतः बनवलेल्या सौंदर्याच्या मापदंडाकडे पाहून प्रतिक्रिया देतात. पण प्रेम नेहमी ‘सौंदर्याच्या श्रेणी’प्रमाणे चालत नाही.

या प्रतिक्रियांमागे दोन मानसिक घटक दिसतात—न्यूनगंड आणि सौंदर्याधारित श्रेष्ठत्वाचा भ्रम. समाजाच्या विश्वासांना चूक ठरवणाऱ्या जोड्या लोकांना असह्य वाटतात . पण यापलीकडे एक महत्त्वाचं वास्तव आहे. आजच्या नव्या पिढीची नात्याबद्दलची दृष्टी बदलती आहे. ते भावनिक कनेक्शन, कॅरेक्टर, सुरक्षा, समज, स्थिरता आणि मूल्यांना अधिक महत्त्व देतात. त्यांच्या निर्णयांमध्ये सौंदर्य हा घटक असू शकतो, परंतु निर्णायक ठरत नाही. सूरज-संजनाच्या संदर्भातून दिसणारी गोष्ट अशी की प्रेमाची समीकरणं आज अधिक व्यक्तिकेंद्रित झाली आहेत आणि ते समाजाने बनवलेल्या बाह्य अपेक्षांपेक्षा अधिक खोल आहेत.

सौंदर्याच्या धारणेबद्दलचा सर्वात मोठा प्रश्न असा आहे की सौंदर्याची परिभाषा खरंच कोण ठरवतं? समाज? परंपरा? की व्यक्तीची नजर? सौंदर्य म्हणजे सदैव तुलनेतून निर्माण होणारी संकल्पना. म्हणूनच सुंदरता ही सार्वत्रिक सत्य नसून एक सामाजिक समज आहे. सूरज-संजनाचं लग्न हे एका अर्थानं सौंदर्यसत्तेवरचं प्रत्यक्ष उत्तर आहे. प्रेमाला ‘रूपाच्या सर्टिफिकेट’ची गरज नसते. दोघांच्या नात्यातील स्वाभाविकता, प्रामाणिकता आणि एकमेकांबद्दलचा समज हेच त्यांचं सौंदर्य आहे.

Tags:    

Similar News