Humans in the Loop Review : AI आणि मुलांचा सांभाळ करणाऱ्या आदिवासी ‘नेहमा’ची कहाणी

तंत्रज्ञानाला(AI) शिकवता शिकवता आपल्या मुलांचा सांभाळ करणं एखाद्या आईला किती संघर्षाचं असतं हे सांगणारा चित्रपट Humans in the Loop… हा चित्रपट नेमकं काय शिकवतो? सांगताहेत लेखिका सुषमा दातार नक्की वाचा..

Update: 2025-11-25 15:34 GMT

'Humans in the loop' एक अप्रतिम चित्रपट. आदिवासी आणि निसर्गाचं अदीम नातं, आदिवासी आणि AI चं वर्तमान-भविष्य काळासाठीचं नातं हे एका चित्रपटात बघता येईल असं कुणी सांगितलं असतं तर माझा विश्वास बसला नसता. लहान मुलांना वाढवणं आणि AI ला ट्रेन करणं यात साम्य आणि फरक काय आहेत हे एक झारखंड मधला चित्रपट सांगतो, यावरही माझा विश्वास बसला नसता. हा चित्रपट या दोन्ही गोष्टी करतो. अरण्य सहाय आणि त्याच्या टीमने फार वेगळं, विशेष काम केलंय (या चित्रपटाची किरण राव ही अनेकांतील एक executive producer आहे.)

झारखंड मधल्या जंगलानं वेढलेल्या, आदिवासी बहुल अशा एका गावात हा छोटासा चित्रपट घडतो. त्यामुळे रीमा दासच्या आसामी चित्रपटाची आठवण करून देतो. तरीही हा त्यापेक्षा अधिक गहिरा, बहुपदरी आणि जगाला कवेत घेणारा वाटला. कारण या गावातल्या थोड्या शिकलेल्या मुली, बायका Image labeling for training AI हे काम पाश्चात्य क्लाएंट्ससाठी करणाऱ्या सेंटरमधे काम करताहेत त्यामुळे आणि चित्रपटाच्या शेवटी जी अर्पणपत्रिका येते त्यामुळेही.

"To the indomitable spirit of the women of Jharkhand and millions of Data Lablers quietly powering AI across the globe."

(हा गेल्या काही वर्षांतला वाढता ट्रेंड आहे.शिक्षित पण गरीब आणि संधिवंचित लोकांना या कामासाठी गिग वर्कर म्हणून घ्यायचं आणि कमी पैशात भरपूर टार्गेट ओरिएंटेड, repetitive काम करायला लावायचं. त्याच्या दुष्परिणामाची जबाबदारी कुणीही घेत नाही. भारतात,गरीब आफ्रिकी देशात हे मोठ्या प्रमाणावर चालतं. दुसरे पर्याय नसल्यानं आणि शारीरिक कष्ट नसणारं काम असल्यानं हे कामगार मिळत राहतात.)

नेहमा ही आदिवासी स्त्री, निसर्गासोबत, निसर्गाशी संवाद साधत मोठी झालेली. आदिवासी प्रथेप्रमाणे लग्न न करता परंतु लग्न केल्या प्रमाणे नवऱ्या बरोबर संसार मांडते तो रांचीत. परंतु हे नातं टिकत नाही. ती आपल्या मूळ गावात परत येते. अकरा बारा वर्षाची मुलगी धानू आणि लहान बाळ असलेला गुट्टू यांना घेऊन. आदिवासी प्रथे प्रमाणे संसार केलेला असला तरी तिला गावा विवाहितेचा दर्जा नाही. मुलांची कस्टडी मिळवण्यासाठी नोकरी आवश्यक असते. शिकलेली असल्यानं डाटा लेबलिंग सेंटर मधे काम मिळतं परंतु घर गावकुसाबाहेरच मांडावं लागतं.

शहरी वातावरणातून पूर्णपणे अनोळखी अशा जंगल-गावात यावं लागल्यानं आणि वडिलांपासून आईनं आपल्याला तोडलंय अशी भावना असल्यानं मुलगी नाराज आहे. तिला शाळेत सामावून घेतलं जात नाहीये तरीही शिक्षकाच्या प्रोत्साहनामुळे एक मैत्रिण मिळते. वडिलांनी स्मार्टफोन दिलेला असल्यानं रेंज असेल तेव्हा त्यांच्याशी संपर्क ठेवतेय. परत शहरात जाण्याची आशा ठेवून.

हा शिक्षक आईचा बालमित्र आहे. दोघं निसर्गाप्रती संवेदनशीलता ठेवणारी मुलं म्हणून विकसित होतात. तो तिथेच राहतो. ती शहरात जाते पण नाळ इथल्या निसर्गाशी जुळलेली राहिली आहे. मात्र या संवेदनशीलतेचा, निसर्गाचं ज्ञान असण्याचा तिच्या कामात अडथळा होतो. वेगळं तथ्य माहीत असताना क्लाएंटला हवं तसं लेबलिंग करणं तिला पटत नाही. सगळे सुरवंट पेस्ट नसतात हे माहीत असल्यानं ती जे लेबलिंगचं काम करते त्या बद्दल तक्रारी येतात. सुपरवायजर सहृदयी असली आणि नेहमाचं म्हणणं पटत असलं तरी क्लाएंटला हवं तसंच काम झालं पाहिजे असं सांगते कारण तिची नोकरी त्यावर अवलंबून आहे. ती या नव्या स्त्रीयांना ट्रेन करते तेव्हा म्हणालेली असते की, एआयला शिकवणं हे लहान मुलाला शिकवण्यासारखं जे शिकवतो फक्त त्याच्याच आधारावर एआय पुढची कामं करेल.

नेहमा कमााईसाठी एआय ला शिकवते आहे आणि खाजगी जीवनात लहान बाळ मुलगा आणि किशोरवयीन मुलगी वाढवते आहे ते मात्र तिला जमत नाहीये. स्वतःची दुःखं, मुलीचे प्रश्न, अडचणी, गैरसमजुती समजुन घेता न आल्याचा राग यामुळे मुलीशी जवळीक होत नाहीये. उलट ती मुलीलाच हट्टी, बापावर गेलेली अशी लेबलं ती लावते आहे. हे फार सखोल विचार न करता लेबलं लावणं एआय साठी काय करतं आणि आई-मुलीसाठी काय करतं यांची सांगड चित्रपटात फार सुरेख पद्धतीनं उलगडते. त्यासाठी आधुनिक आणि नैसर्गिक दृक् श्राव्य प्रतिमा, प्रतिकं यांचा वापर फारच कल्पकतेनं केलाय.

हा अगदी आजचा आधुनिक चित्रपट आहे. तरीही अदीम असं माणूस आणि निसर्गाचं, माणसा माणसांतलं नातं, माणसातलं जन्मजात शहाणपण आणि संवेदनशीलता जपायला सांगणारा चित्रपटही आहे. यातली सगळी पात्रं आणि त्यांचा परिसर खरे वाटतात असं म्हटलं तर ते अंडर स्टेटमेंट होईल.

चित्रपटाची दृश्यात्मकता कळावी म्हणून नेहमीपेक्षा अधिक फोटो डकवले आहेत. It's on Netflix

सुषमा दातार

लेखिका

(साभार - सदर पोस्ट सुषमा दातार यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)

Tags:    

Similar News