डॉक्टर नववधूच्या कौमार्य चाचणी बाबत महिला आयोगाने मागितला खुलासा...

Update: 2021-11-25 11:40 GMT

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर मार्गावरील रिसॉर्टमध्ये डॉक्टर वधूच्या कौमार्य चाचणीचा प्रकार उघडकीस आल्याबाबतच्या बातम्या समाज माध्यमातून प्रसारित होत असून ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता या प्रकरणाची सखोल चौकशी करून सद्यस्थिती दर्शक अहवाल द्यावा. असे पत्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या आदेशानुसार उपसचिवांनी नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला लिहिले आहे.

अलीकडेच नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली होती. डॉक्टर असलेली वधू आणि अमेरिकन नेव्ही मध्ये अधिकारी असलेल्या वराचा विवाह सोहळा पार पडला. या दोन्ही कुटुंबातील सर्व लोक उच्चशिक्षित आहेत. तरीही डॉक्टर असलेल्या वधूला कौमार्य चाचणीला सामोरे जावे लागणार होते. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळाली आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या बाबत चौकशी केली. त्यानंतर सर्व माध्यमांमधून हा सर्व प्रकार समोर आला. आणि एकविसाव्या शतकातही लग्न झाल्यावर वधूची कौमार्य चाचणी घेतली जाते या घटनेने सर्वांना धक्का बसला.

हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर राज्याच्या महिला आयोगाने दखल घेत नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालयाला पत्र लिहिले असून यामध्ये त्यांनी, नाशिक जिल्ह्यात त्रंबकेश्वर मार्गावरील एका रिसॉर्टमध्ये डॉक्टर वधूची कौमार्य चाचणी घेण्यात येणार असल्याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्रंबकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये अर्ज दिला होता. या आशयाची बातमी समाज माध्यमात प्रसारित होत आहे. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून या प्रकरणाचे गांभीर्य व आशय पाहता या बाबत साधार स्पष्टीकरण करणारा सद्यस्थिती दर्शक अहवाल महिला आयोगास पाठवावा असं म्हटले आहे.

Tags:    

Similar News