महाराष्ट्राच्या मातीतील महिला शेतकरी म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा

Women Farmers In Maharashtra Are The Backbone Of The Rural Economy | महाराष्ट्राच्या मातीतील महिला शेतकरी म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा | MaxWoman

Update: 2025-09-25 14:20 GMT

महाराष्ट्रातील शेतीबद्दल बोलताना आपण बहुतेक वेळा नांगरणी करणारे, शेतात उभे असलेले पुरुष शेतकरी किंवा रोकड पिकांवर काम करणारे पुरुषच पाहतो. पण प्रत्येक यशस्वी पीक, प्रत्येक भरघोस हंगामाच्या मागे एक अदृश्य पण महत्वाचा घटक असतो. ती म्हणजे महिला. या महिला फक्त कष्टकरी नाहीत, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. शेती उत्पादनाबरोबरच समाज आणि संस्कृती घडवण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. तरीही त्यांच्या योगदानाला फारसं मान्यता मिळालेली नाही, ही मोठी पोकळी आहे.

इतिहास पाहिला तर महिलांचा शेतीतील सहभाग खूप जुना आहे. विदर्भात कापूस आणि सोयाबीन लागवडीत महिलांचा मोठा हात आहे. पश्चिम घाटात महिलाच आंबा, काजू यासारख्या बागायती पिकांची देखभाल करतात. तरीही परंपरेने जमीन मालकी, शेतीची ओळख आणि नेतृत्वाची संधी पुरुषांपुरतीच मर्यादित ठेवली गेली. महिलांचं काम हे "सहाय्यक" म्हणूनच मानलं गेलं, मुख्य म्हणून नाही. आजही ग्रामीण भागातल्या जवळपास 70% महिला शेतीकामात गुंतलेल्या आहेत. बी पेरणं, किड नियंत्रण, जनावरांची काळजी, अशा सर्व कामांत त्या पुढे आहेत. घरगुती पातळीवर तर त्या पिकांची निवड, खर्चाचा हिशोब, उत्पादनाचं विक्री व्यवस्थापन याबाबतही महत्वाचे निर्णय घेतात. महाराष्ट्राच्या विविध भागांतल्या महिलांच्या कथा हे अधिक स्पष्ट करतात. मराठवाड्यात महिलांनी एकत्र येऊन सहकारी संस्था उभारल्या ज्यामुळे बियाणं आणि खत सहज मिळू लागलं. कोकणात महिलांनी पारंपरिक सेंद्रिय शेती पुन्हा जिवंत केली. म्हणजे या महिला फक्त मजूर नाहीत, तर नवकल्पना करणाऱ्या, नेतृत्व करणाऱ्या आणि शाश्वत शेती जपणाऱ्या आहेत. मी स्वतः विदर्भातून आहे, पण इथे मात्र मला असे उपक्रम दुर्दैवाने फारसे दिसले नाहीत.

अजूनही महिलांसमोर मोठ्या अडचणी आहेत. त्यातली सर्वात मोठी म्हणजे जमीन मालकी. फार कमी महिलांच्या नावावर शेती आहे. त्यामुळे त्यांना शासनाची मदत, कर्जसुविधा किंवा अधिकृत शेतकरी म्हणून ओळख मिळणं कठीण होतं. समाजातील बंधनं त्यांना प्रशिक्षण कार्यक्रमांत किंवा निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ देत नाहीत. यामुळे त्यांच्या कामाचं महत्त्व झाकलं जातं. त्यांना योग्य मानधन, साधनं आणि धोरणांवर प्रभाव टाकण्याची संधी मिळत नाही. तरीही त्यांच्या प्रभावाला नाकारता येत नाही. त्या घराचा अन्नसुरक्षा टिकवतात, स्थानिक बाजारपेठेला आधार देतात आणि समुदायाला सक्षम करतात. पाणी साठवण, बियाणं जपणं, लहान सहकारी संस्था चालवणं, अशा अनेक उपक्रमांमधून त्या अर्थव्यवस्थेला बळकटी देतात. विशेष म्हणजे त्या पारंपरिक ज्ञानातून माती, पाणी आणि जैवविविधता जपतात. त्यांचे उपाय अनेकदा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या यांत्रिक शेतीपेक्षा जास्त शाश्वत असतात.

म्हणूनच महाराष्ट्रातील महिला शेतकरी या फक्त मजूर नाहीत. त्या शेतीच्या यशाच्या खऱ्या शिल्पकार आहेत. त्यांचा कष्ट, त्यांची शहाणपण आणि त्यांची बांधिलकी कुटुंबं, गावं आणि संपूर्ण प्रदेश उभा करतात. त्यांना योग्य ओळख आणि सामर्थ्य देणं हे फक्त न्यायाचं प्रकरण नाही, तर महाराष्ट्राच्या शेतीच्या भविष्यासाठी एक मोठं गुंतवणूक आहे. महिलांना सक्षम करणं म्हणजे शाश्वत विकास, आर्थिक प्रगती आणि सामाजिक समतेचा मार्ग. आता वेळ आली आहे की या अदृश्य श्रमिकांना प्रकाशात आणावं, त्यांच्या योगदानाचं कौतुक करावं आणि त्यांना खरं स्थान द्यावं.

- तेजस्वी बारब्दे पाटील

अमर

Tags:    

Similar News