पंकजा मुंडे स्वत:चा पक्ष काढणार?

Update: 2023-06-04 07:23 GMT

मागच्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चा वारंवार झाल्या आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना ''मी कधी कुणा समोर झुकणार नाही'' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी रोखठोक भूमिका मांडली. यानंतर पंकजा मुंडे स्वत:चा पक्ष काढणार अशी चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे काही मोठा विचार करत आहेत का? 

माजी मंत्री पंकजा मुंडे आपल्याच पक्षावर नाराज असल्याचं वारंवार म्हटलं जात आहे. अनेक वेळा त्यांच्या वक्तव्यातून तसं दिसून सुद्धा आला आहे. यापूर्वीचा जर विचार केला तर यापूर्वी देखील अनेक घटना घडल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडे यांना मुद्दामून डावलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अनेक वेळा मुंडे समर्थकांनी केला आहे. त्यामुळे मागच्या इतक्या दिवसांपासून हे सगळं होत असताना पंकजा मुंडे आता काहीतरी मोठा निर्णय घेऊ शकतात असं सुद्धा म्हटलं जाऊ लागला आहे. काल त्यांनी भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने गोपीनाथ गडावरुन कार्यकर्त्यांना संबोधीत केले. मी कधी कुणा समोर झुकणार नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी रोखठोक भूमिका मांडली. यानंतर पंकजा मुंडे स्वत:चा पक्ष काढणार अशी चर्चा रंगली आहे.

वर्षभरात पंकजा मुंडे यांच्या नाराजीची चर्चा कधी कधी झाली.. 

अलीकडच्या काळात विचार केला तर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळेल अशी चर्चा होती. पण त्यांना विधान परिषद निवडणुकीत डावलण्यात आलं. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांना स्थान मिळेल असे देखील म्हटले जाऊ लागलं पण त्यावेळी देखील त्यांना नारळ देण्यात आला. या प्रकारानंतर पंकजा मुंडे यांची नाराजी आपल्याला दिसून आली. बीडमध्ये तर उघड उघड पंकजा मुंडे समर्थकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी नाराजी व्यक्त करत अनेक समर्थकांनी भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निदर्शने केली. पण ही चर्चा थांबली त्यासाठी कारण होतं ते म्हणजे ज्यावेळी शपथविधी पार पडला त्या शपथविधीला पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र दिसले. त्यानंतर ही संपूर्ण चर्चा बंद झाली. आता पुन्हा पंकजा मुंडे यांच्या विधानाने ही चर्चा सुरु झाली आहे.

पंकजा मुंडे भाजपला रामराम करणार का?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. यावेळी मंचावर पंकजा मुंडे या सुद्धा उपस्थित होत्या या कार्यक्रमात पंकजा मुंडे भाषण करण्यासाठी उभ्या राहिल्या आणि त्यानंतर त्यांनी भाषणात काही सूचक विधाने केली. ''भाजप माझा थोडी आहे. मी भाजपात आहे. भाजप पक्ष मोठा आहे'' असं एक विधान यावेळी त्यांनी केलं. यासोबतच त्यांनी वडिलांसोबत भांडण झालं तर भावाच्या पक्षात जाऊ शकते असं म्हटलं. या त्यांच्या वक्तव्यानंतर नक्की पंकजा मुंडे काय विचार करत आहेत? पंकजा मुंडे भाजपला रामराम करण्याचा विचार करत आहेत का? अशा चर्चा आता सर्वत्र सुरू झाल्या आहेत. त्यानंतर काल त्यांनी माझे नेते अमित शाह आहेत. लवकरच मी अमित शाह यांची भेट घेणार आहे. त्यांच्याशी मनमोकळेपणानं बोलणार असल्याचं त्यांनी सांगितले. जेव्हा भूमिका घ्यायची असेल तेव्हा सगळ्यांना बोलावून सगळ्यांच्या समोर बिनधास्त भूमिका घेणार, अस पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यामुळे भाजप पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करणार का? की पंकजा मुंडे काही मोठा निर्णय घेतात येणाऱ्या काळात पाहावं लागेल. तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडे भाजप सोडतील का? की पंकजा मुंडे नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप यशस्वी होईल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा...

Tags:    

Similar News