भाजपच्या विजयी उमेदवार उमा खापरे कोण आहेत?

Update: 2022-06-08 08:38 GMT

विधान परिषद निवडणुकीमध्ये एकमेव महिला उमेदवार असलेल्या भाजपच्या उमा खापरे यांचा विजय झाला आहे. उमा खापरे यांचं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले होते. आज दिवसभर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यानंतर काँग्रेसने भाजपच्या दोन मतांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे विधान परिषदेचा निकाल राज्यसभेच्या निकालाप्रमाणेच लांबणीवर पडेल की काय असेच सर्वांना वाटत होतं. त्यानंतर निवडणूक आयोगाने हा आक्षेप फेटाळला व काही वेळात मतमोजणीला सुरवात झाली. आता निकाल समोर आले आहेत. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. भाजपच्या संख्याबळानुसार विधान परिषदेवर चार उमेदवार निवडून जाऊ शकत होते. मात्र भाजपने पाचवा अतिरिक्त उमेदवार दिला. त्यामुळे उमा खापरे यांना शेवटचा पसंतिक्रम देण्याचं पक्षाने ठरवलं असल्याचं म्हंटल जात होतं. मात्र भाजपने केलेल्या रणनितीमुळे उमा खापरे यांचा विजय झाला आहे.

कोण आहेत उमा खापरे?

उमा खापरे या भाजपच्या अत्यंत आक्रमक नेत्या आहेत. त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी भाजपमध्ये महिला मोर्चा प्रदेश सचिवपदासह संघटनेत विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. भाजपमधील जुन्या नेत्या म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणूनही ओळखल्या जातात. तसेच उमा खापरे या पिंपरी-चिंचवडच्या आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेविका म्हणून चांगले काम केलं आहे. सलग दोनवेळा त्यांनी नगरसेविका म्हणून काम केलं आहे. 2001-2002 मध्ये त्या पिंपरी चिंचवड पालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या.

दिपाली सय्यद यांच्यावरील टीकेने प्रसिद्धी झोतात

दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना नेते दिपाली सय्यद आणि उमा खापरे यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. मोदींवर आक्षेपार्ह टीका केली तर घरात घुसून चोप देऊ, असं जाहीर विधान खापरे यांनी केलं होतं. त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. मात्र आता भाजपने विधानपरिषद उमेदवारी दिल्याने पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांचा पत्ता कट झाला आहे.

Tags:    

Similar News