Slow Living म्हणजे काय?

Update: 2025-09-01 15:45 GMT

वर्किंग अवर्स १२ तास करण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरु आहे. त्याअनुषंगाने फेसबुक पोस्ट केली होती. ज्यात Slow Living विषयी अगदीच थोडक्यात लिहिले होते. त्यानंतर अनेकांनी ही संकल्पना काय आहे हे सविस्तर लिही असे सुचवले म्हणून ही पोस्ट.

Slow Life ची सुरुवात ८० च्या दशकात इटलीमध्ये झाली. आणि याला कारणीभूत होतं मॅकडोनाल्ड ही खाद्यपदार्थ विकणारी कंपनी. १९८६ साली Carlo Petrini नावाच्या इटालियन लेखकाने ही चळवळ सुरू केली. मॅकडोनाल्ड आणि तत्सम फूड चेन्समुळे स्थानिक पदार्थ, त्यांची सादगी, त्यांचं रोजच्या जगण्यातलं महत्व आणि त्यांच्या माणसांच्या जगण्याशी, विचार करण्याच्या पद्धतींशी, जीवनशैलीशी असलेला जवळचा संबंध या सगळ्यावर परिणाम होतो, होऊ शकतो. Fast Food या संकल्पनेला विरोध म्हणून कार्लो पेट्रीनी यांनी Slow Food ही चळवळ सुरु केली. पण तो विचार अन्नपुरता मर्यादित राहिला नाही. आधुनिकीकरणाच्या झंझावातात जिथे जिथे म्हणून थोडं थांबण्याची, श्वास घेण्याची, स्वतःला वेळ देण्याची गरज माणसांना वाटली त्या प्रत्येक क्षेत्रात हा विचार पोचला. त्यातून Slow Life किंवा स्लो लिविंग या विचाराचा परीघ तयार झाला. Slow Living ची सुरुवात अन्न पदार्थांपासून झाली असली तरी पुढे या संकल्पनेचा प्रवास आणि प्रसार करियर, प्रवास, फॅशन, शिक्षण, पालकत्व, तंत्रज्ञानाचा वापर अशा बहुतेक सगळ्या क्षेत्रात झाला आहे. पाठोपाठ १९९०-२००० या दशकात Slow Cities (Cittaslow) ही चळवळ सुरू झाली, जिथे शहरांनी स्वतःला हळू, शांत, स्थानिक संस्कृती जपणारी, टिकाऊ जीवनशैली असलेली ठिकाणे म्हणून घडवण्यावर भर दिला गेला. २००४ मध्ये Carl Honoré यांचे In Praise of Slow हे पुस्तक प्रकाशित झाले. यात त्यांनी काम, प्रवास, अन्न, पालकत्व, शिक्षण, तंत्रज्ञान यामध्ये वेग कमी करण्याचे फायदे नमूद केले आणि या संपूर्ण विचाराला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. आणि पोस्ट डिजिटलायझेशननंतर (२०१० नंतर) Slow Tech, Digital Minimalism, आणि Mindful Living सारख्या संकल्पना पुढे आल्या. तंत्रज्ञानाचा मर्यादित, जाणीवपूर्वक वापर हा याचा केंद्रबिंदू बनला.

काही महिन्यापूर्वी आम्ही सायबर मैत्र आणि gry फाउंडेशनच्या वतीने ४५ मिनिटांचा काहीही न करण्याचा चॅलेंज केला होता तोही याच slow living संकल्पनेवर आधारित होता.

Slow living म्हणजे आळशीपणा नाही, कामचुकार पण नाही, वेळा न पाळणे नाही. मनमानी नाही. अनेक जण यात गल्लत करतात.

Slow life म्हणजे जाणीवपूर्वक, धीम्या गतीने आणि अर्थपूर्ण पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करणं. आपले ध्येय काय आहे याचा सतत विचार करण्यापेक्षा त्या ध्येयापर्यंत पोचण्याचा जो प्रवास आहे त्या प्रवासाचा आनंद घेणं. प्रेसेंट असणं. आहे त्या क्षणाचा आनंद घेणं. यात स्वतःच्या वेलबीइंग बरोबर आपल्या कुटुंबियांचे, आपल्या सहकाऱ्यांचे, आपल्या सोबत आणि आपल्या टीममध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचे आणि मग अर्थातच आपल्या समाजाचे ‘वेल बिईंग’!, समभाव. सहवेदना. आपल्याला काय हवे आहे, किती हवे आहे याचा विचार करुन तितक्याच गोष्टी निवडणं, मुळात करत असलेली प्रत्येक निवड विचार पूर्वक आणि अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करणं. मग ते अन्न असो नाहीतर ऑनलाईन शॉपिंग. Need आणि Want यांमधला फरक समजून घेणं. ही प्रक्रिया व्यक्तिसापेक्ष आहे. पण तरीही यात काही मूलभूत तत्व मानली जातात.

Slow Life चं तत्त्वज्ञान काय सांगतं? तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, सजगता. जे करतोय ते का करतोय याचा विचार करणं. आपल्या वर्तनाचे आणि निर्णयांचे आपल्यावर, कुटुंबावर, आपण काम करत असलेल्या ठिकाणी, इतर लोकांवर काय परिणाम होणार आहेत याचा विचार करणं. एक गोष्ट लक्षात घेऊया, प्रत्येक जण बदलांसाठी रस्त्यावर उतरू शकत नाही, चळवळींमध्ये कार्यकर्ता बनू शकत नाही पण स्वतःपुरते काही बदल प्रत्येक माणूस नक्कीच करु शकतो. ते शक्य आहे. त्यासाठी ना पैसा लागतो, ना संसाधने लागतात. लागतो फक्त विचार आणि प्रोऍक्टिव्हीनेस. Slow living मधल्या काही गोष्टी समजून घेऊया.


१. सजगता (Mindfulness): प्रत्येक क्षणाचा जाणीवपूर्वक अनुभव घेणं. जे करतो त्यात पूर्ण लक्ष देणं. कुठे पोचायचे आहे यापेक्षा चालू प्रवासात सजग असणं. प्रेसेंट असणं. पूर्वग्रहांपेक्षा विवेकी असणं. दोन छोटी उदा. फॅशन आणि प्रवास याबाबत देता येतील. जगभर फास्ट फॅशन असताना आता लोक स्लो फॅशनचा विचार करु लागले आहेत. म्हणजे सतत वेगवेगळे ट्रेंड्स बाजारात येत राहिले तरी ते फॉलो करण्याचं बंधन झुगारुन द्यायचं. बाजारपेठीय निर्णय न करता सजगतेनं आणि समाजहिताच्या विचारात निर्णय करणं. कपड्यांचा कचरा ही पृथ्वीची खूप मोठी समस्या आहे, मग आपल्याला खरंच फास्ट फॅशन हवी आहे का? किंवा प्रवासाला गेल्यावर आहे त्या क्षणांचा आनंद घेणं, प्रेसेंट असणं. हल्ली अनेकदा अनेक देवळांमध्ये नमस्काराला गेलेल्या लोकांना एक क्षण देवाकडे शांतपणे बघायलाही दिले जात नाही, सिक्युरिटीवाले देवाच्या समोर भक्तांचे डोके आपटतात आणि त्यांना पुढे ढकलतात (मी कुठल्याही देवळात जात नाही, हे व्हिडीओ रीलमध्ये बघितले आहेत.) आता फास्ट फॅशन, फास्ट फूड सारखी फास्ट भक्ती आहे. आपण काय करतोय याचा विचार कुणीच यात करताना दिसत नाहीये. तो सुरु करणं म्हणजे स्लो लाईफ.


२. नैसर्गिकता (Natural Living): जितकी शक्य आहे तितकी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं. यासाठी जंगलात जाऊन राहणं अपेक्षित नाही किंवा गावखेड्यात स्थलांतर करायलाच हवं असंही काही नाही. आपण आहोत तिथेच काय बदल करु शकतो, कितीपत करु शकतो याचा विचार करुन टप्प्या टप्प्याने ते स्वीकारत जाणं. अगदी साधं उदा. देते. बाहेर पडताना कापडी पिशवी जवळ बाळगणं आणि प्लॅस्टिकच्या पिशवीसाठी आग्रह न धरणं. किंवा विकतचे प्लॅस्टिकच्या बाटलीमधील पाणी घेण्यापेक्षा स्वतःची पाण्याची बाटली जवळ बाळगणं. हे बदल करणं प्रचंड अवघड मुळीच नसतं. फक्त सवय लावावी लागते. पूर्वी कुणाच्या लग्नात जाताना स्वतःचे ताट वाटी, भांडं नेण्याची पद्धत होती, या अतिशय पर्यावरणपूरक सवयी आणि पद्धती होत्या. पण त्या आपण डिस्कार्ड केल्या.


३. टिकाव आणि शांतपणा: Quality over Quantity या विचाराला प्राधान्य. किती केलं यापेक्षा कसं केलं याचा विचार. उदा, आजच्या धकाधकीच्या जगण्यात आपल्याला जे आयुष्य अपेक्षित आहे ते मिळवण्यासाठी जे कष्ट करावे लागतात. त्यातून जो ताण येतो तो हाताळण्यासाठी व्यसनांच्या दिशेने जायचे की ताण हाताळण्याच्या अधिक योग्य पद्धती स्वीकारायच्या यातला निर्णय करता येणं. व्यसनांचे पर्याय सोपे आहेत पण विचारी नाहीत. त्यात सजगता नाही. आपली want ची यादी किती मोठी ठेवायची आहे याचा निर्णय, त्याला पूर्णविराम कधी द्यायचा आहे याचा विचार. ‘अजून जास्त’ हे कधीही न संपणारं समीकरण असतं त्यामुळे ‘आता बास’ हे कधी ते ठरवता येणं. फोमो पेक्षाही जोमो म्हणजे जॉय ऑफ मिसिंग आऊटचा विचार करणं. आपल्याला सगळं मिळून शकत नाही, आपल्याला जगातल्या प्रत्येक गोष्टीची गरजही नसते. अशावेळी काही गोष्टी मिस आऊट झाल्या तरी त्याने अस्वस्थ न होणं, त्याने असुरक्षित न होणं. आपलं जगणं आपण केलेल्या निर्णयांच्या साखळीतून तयार होत असतं. त्यामुळे सजगतेने निर्णय करता आले तर आपल्याला हवं तसं आयुष्य जगण्याची संधी मिळू शकते. कारण आपला प्रत्येक निर्णय आणि त्या निर्णयातून तयार होणारी साखळी ही वेगळी असते. शांतता, समाधान या बाह्य गोष्टी नाहीत हे स्वीकारणे आणि स्वतःवर काम करण्याची तयारी ठेवणं.


४. संतुलन (Less Stress): वेग म्हणजे यश नाही हे समजून घेणं. १२ तास काम केलं म्हणजे प्रत्येक जण उत्तम काम करेल असा विचार करणं घातकी आहे. उलट वेग कमी करुन ताण कमी होऊ शकतो आणि गुणवत्ता वाढू शकते. आजच्या जगण्यात ताण आहेच. किंवा असं म्हणून माणसांच्या प्रजातीत करोडो वर्षे ताण कायमच आहे. अशावेळी त्या अधिकच्या शोधात किती धावायचं आहे, कुठल्या दिशेने धावायचं आहे, आणि कुठे ब्रेक घेऊन श्वास घ्यायला थांबायचं आहे हे ठरवता आलं तर येणारा ताण हाताळणं त्या मानाने सोपं जातं. ताणाच्या व्यवस्थापनात ब्रेक्स आणि पोजेस यांना अफाट महत्व आहे. हल्ली आपण सतत हायपर आणि मल्टिटास्किंग मोडवर असतो. आपल्याला सतत इतकं हायपर ऍक्टिव्ह राहण्याची गरज आहे का? समजा आपण चार गोष्टी आजच्या ऐवजी दोन वर्षांनी केल्या, सहा महिन्यांनी मिळवल्या, चार दिवसांनी झाल्या तर काय होणार आहे याचा विचार करता येणं आवश्यक आहे. कामांचे, विचारांचे, निर्णयांचेही अग्रक्रम लावता येणं आवश्यक आहे. कारण संतुलन असेल तरच हुसहुस कमी होऊ शकते. सतत धावपळ न करता विश्रांती घेणं, स्वतःसाठी वेळ काढणं, असा वेळ काढला म्हणून यात गिल्ट मानून न घेणं. ती गरज आहे हे समजून थोडं हायपर ऍक्टिव्ह मोड मधून बाहेर येणं आणि मनाचं, विचारांचं आणि देहाचं संतुलन (मानसिक आणि शरीरिक स्वास्थ्य) मिळण्याचा प्रयत्न करणं. Less but Better हा दृष्टिकोन महत्त्वाचा. चार गोष्टी कमी केल्या तरी चालू शकतात पण जाणीवपूर्वक आणि चांगल्या प्रकारे करण्यावर भर हवा.


५. स्थानिक गोष्टींचं महत्त्व (Local over Global): ज्या विचारातून slow life ची सुरुवात झाली, तो विचार. Going back to our roots. स्थानिक अन्न, उत्पादनं आणि संस्कृती यांना प्राधान्य. समाजाचे सरसकटीकरण आणि सुमारीकरण टाळणं. विविधतेचे महत्व लक्षात घेऊन ती विविधता टिकवण्याचा प्रयत्न. स्टॅण्डर्डायझेशन नाकारणं.


६. Slow Tech, Digital Minimalism: सतत ऑनलाईन असण्याच्या सक्तीतून स्वतःला बाहेर काढणं. सतत नवीन गॅजेट्स विकत घेण्याच्या सवयींना ब्रेक देणं. आपल्याकडे बाजारातील प्रत्येक लेटेट्स गॅजेट असायला हवे आणि मग ते विकत घेता यावे यासाठी जो पैसा हवा त्यासाठी सतत कामांच्या ओझ्याखाली जगणे यातून स्वतःची सुटका करणं. डिजिटल स्पेसमधून ब्रेक्स घेणं. आपण सतत ऑनलाईन असतो आणि त्या ऑनलाईन असण्याचा प्रचंड ताण आपल्यावर येत असतो. त्याला डिजिटल फटीक म्हणतात. इंटरनेट ऍडिक्शन समजून घेऊन त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं, स्क्रीन टाइम मॅनेज करायला शिकणं. डिजिटली शिक्षित असणं. तंत्रज्ञानाचा सजग, मर्यादित आणि उद्देशपूर्ण वापर करणं जेणेकरुन डिजिटल फटिक येणार नाही, मानसिक शांतता मिळेल आणि कार्यक्षमता वाढेल.

Slow living हा निर्णयांचा प्रवास आहे. तो मानसिक प्रवास आहे. तो स्वीकारणं वाटतं तितकं सोपं नसलं तरी प्रत्येकाला शक्य आहे. यातल्या सगळ्या गोष्टी एकदम जमू शकत नाहीत. आपण परस्परावलंबी समाज आहोत त्यामुळे अनेकदा त्यात आपले आग्रह काम करत नाहीत. पण तरीही निराश न होता, प्रयत्न करत राहणं, योग्य पर्याय निवडून आपल्या जगण्याचे वास्तव बदलण्याचा प्रयत्न करणं शक्य आहे. मी या प्रवासाला लागले आहे, या प्रवासात सहभागी होणाऱ्या सगळ्यांना खूप शुभेच्छा.

मुक्ता चैतन्य

muktaachaitanya@gmail.com

cybermaitra@gmail.com

Tags:    

Similar News