'जी बाई फांदी तोडेल तिचा नवरा मरेल...'

Update: 2022-06-14 07:43 GMT

आज वटपौर्णिमा हा सण महिला अगदी उत्साहात साजरा करत आहेत. हाच नवरा सात जन्म मिळावा यासाठी या महिला वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात आणि आपली इच्छा व्यक्त करतात. आता तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर ग्रामीण भागात अनेक महिला गावातील वडाच्या झाडाजवळ जातात आणि एकत्र मिळून त्या झाडाला दोरा गुंडाळून त्या झाडाला हळद-कुंकू व नैवेद्य देऊन पूजा करतात. या दिवशी हजारो महिला वेगवेगळ्या ठिकाणी वडाच्या झाडाला दोरे गुंडाळतात. यात लक्ष्यात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे, छोट्या झाडांना सुद्धा अशाच प्रकारे दोरे गुंडाळले जातात. यामुळे काय होतं तर ती झाडे दोन ते तीन दिवसात सुकलेली दिसतात. खरंतर वडाचे झाड असे आहे की, ज्यामधून ऑक्सिजनची मात्रा सर्वात जास्त उत्सर्जित होते. त्यामुळे वारंवार वडाचे झाड लावा त्यांचे जतन करा असं सांगितलं जातं. मात्र आज वटपौर्णिमे दिवशी अशाप्रकारे वडाच्या झाडाला दोर गुंडाळल्यामुळे अनेक झाडांचा अक्षरशः जीव घेतला जातो.

आता हे झालं खेड्यातलं शहरी भागात तर आता एक नवीन ट्रेंड आला आहे. वटपौर्णिमा घरीच साजरी केली जाते. मग त्यासाठी महिला बाजारात जातात आणि वडाच्या झाडाच्या फांद्या विकत आणतात. आणलेली फांदी घरातल्या एका कुंडीत लावली जाते आणि घरातच वटपौर्णिमा साजरी केली जाते. फक्त वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी कित्येक वडाच्या झाडांना अक्षरशहा बोडके केले जाते. आता याबाबत लोकांना कितीही सांगितलं किंवा त्यांचं कितीही प्रबोधन केलं तरी त्यांचे मनपरिवर्तन मात्र अजूनही होताना दिसत नाही. आता यावर उपाय काय? तर यावरचा एक उपाय सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.

एका वडाच्या झाडाला एक पाटी लटकवलेली आहे आणि या पाटीवर लिहिले आहे की, "जी बाई फांदी तोडेल तिचा नवरा मरेल, मिशन हिरवीगार डोंबिवली" आता अशी भन्नाट कल्पना डोंबिवलीकरांनी अवलंबली आहे ज्यामुळे झाडाची फांदी तोडायचा तर सोडाच पण या झाडाजवळ कुणीही पूजा सुद्धा करायला आलेलं दिसत नाही.

आपण आपले सण, समारंभ हे नक्की साजरे केले पाहिजेत. पण यामुळे जर पर्यावरणाला हानी होत असेल तर मात्र आपण करत असलेल्या कृत्याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. जर आपण करत असलेल्या कुठल्याही कृतीतून पर्यावरणाची काही होत असेल तर आपण अशा गोष्टी न करता त्या इतरांनाही न करण्यास भाग पाडले पाहिजे. बाकी डोंबिवलीकरांनी जी शक्कल लढवली आहे त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात आहे.

• टीप - हा फोटो कधीच आहे याबाबतची कुठलीही पुष्टी होऊ शकलेली नाही.

Tags:    

Similar News