Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या सुप्रसिध्द अभिनेत्रीचा मृत्यू

रशिया युक्रेन युध्दामध्ये अनेक नागरीकही मृत्यूमुखी पडले आहेत. यात आता युक्रेनच्या ज्येष्ठ अभिनेत्री ओक्साना श्वेट्स यांचा गोळीबारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Update: 2022-03-18 06:29 GMT

मागील महिन्यात २४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर आक्रमण करत युद्ध पुकारलं. तेव्हापासून गेल्या तीन आठवड्यांपासून रशियाने युक्रेनच्या वेगवेगळ्या भागात हल्ले करून युक्रेनला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला आहे. तीन आठवडे सरून सुध्दा लहानग्या युक्रेनची राजधानी किव्हवर ताबा मिळवणं रशियन फौजांना शक्य झालेलं नाही. राजधानी किव्हवर रशियन सैन्याकडून सातत्याने हल्ले केले जात आहेत. याच हल्ल्यात प्रसिद्ध युक्रेनियन अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे.

यंग थिएटरच्या लोकप्रिय अभिनेत्री ओक्साना श्वेट्स यांचा राजधानी किव्हमध्ये रशियन सैन्याच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. त्या अभिनेत्रीचे वय ६७ वर्षांच्या होत्या. ओक्साना यांना 'युक्रेनच्या सन्मानित कलाकार' या देशाच्या सर्वोच्च कलात्मक पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. ओक्साना यांच्या निधनाची पुष्टी करत यंग थिएटरने एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये असं लिहिलंय की, "किव्हमधील निवासी इमारतीवर झालेल्या गोळीबारात, युक्रेनच्या प्रसिद्ध आणि आणि लोकप्रिय अभिनेत्री ओक्साना श्वेट्स यांचा मृत्यू झाला आहे."

दरम्यान, द न्यूयॉर्क टाईम्सनं अमेरिकी प्रशासनाच्या माहितीनुसार दिलेल्या वृत्तानुसार आत्तापर्यंत युक्रेनमध्ये ७ हजार रशियन सैनिक ठार झाले असून १४ हजार जखमी झाले आहेत. हा आकडा अमेरिकेने इराक आणि अफगाणिस्तानमध्ये २० वर्ष लढलेल्या युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांपेक्षाही जास्त आहे. पण दुसरीकडे रशियाने मात्र हा दावा खोडून काढत २ मार्चपर्यंत फक्त ४९८ रशियन सैनिक मृत्यूमुखी पडले असून १५९७ सैनिक जखमी झाल्याची आकडेवारी दिली आहे. त्यानंतर रशियाकडून कोणतीही आकडेवारी अद्याप देण्यात आलेली नाही.

Tags:    

Similar News