दुचाकींच्या नंबर प्लेटमधून 'SEX' शब्द हटवणार ; दिल्ली सरकारचे RTO ला आदेश

Update: 2021-12-06 04:10 GMT

दिल्लीतील दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये एसईएक्स (सेक्स) शब्द येत आहे. या शब्दाला एका तरुणीने आक्षेप घेत परिवहन विभागाने हा शब्द असलेली वाहन क्रमांकाची सिरीज मागे घ्यावी अशी मागणी केली आहे. प्रशासनाने देखील याची दखल घेत ही सिरिज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेटवर एस अक्षर असते. एस अक्षर असलेला नंबर दुचाकी वाहनाचा असल्याचे स्पष्ट होते. दिल्ली परिवहन विभागाकडून वाहनांच्या नंबरची सिरीज 'ईएक्स' या अक्षरांनी सुरू आहे. त्यामुळे ही तिन्ही अक्षरे एकत्र लिहिल्याने सेक्स (एसईएक्स) अशी अक्षरे दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेटवर येतात.

दरम्यान एका तरुणीच्या दुचाकी वाहनांवर हा शब्द आल्याने तिला शेरेबाजी ऐकावी लागल्याने संबंधित तरुणीने दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार केली. आणि हा नंबर त्वरित बदलून देण्याची मागणी केली. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी या तक्रारीची दखल घेत परिवहन विभागाला या सिरीजचे नंबर देणे त्वरित थांबविण्याचे आदेश दिले, तसेच या सिरीजचे नंबर किती वाहनांना देण्यात आले, याची माहिती तात्काळ द्यावी, असे निर्देश दिले. दरम्यान परिवहन विभागाने देखील ही सिरीज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags:    

Similar News