अखेर वेदिकाची मृत्यूशी झुंज संपली ; अनेकांनी व्यक्त केली हळहळ

Update: 2021-08-02 10:46 GMT

Spinal Muscular Atrophy Type- One या अतिशय दुर्धर आजाराने ग्रासलेल्या भोसरी येथील वेदिका शिंदे या चिमुकलीची मृत्यूशी झुंज अखेर संपली.वेदिकाच्या जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


Spinal Muscular Atrophy Type- One या अतिशय दुर्धर आजाराने ग्रासलेल्या भोसरी येथील वेदिका शिंदे या चिमुकलीची मृत्यूशी झुंज अखेर संपली. तिचा जीव वाचवण्यासाठी 16 कोटीचे इंजेक्शन लागणार होते. मात्र, कोरोना काळातही अनेकांनी माणुसकी जपत वेदिकाला देश-विदेशातून मदत मिळाली होती. परंतु, इंजेक्शन मिळून देखील आज अखेर तीने शेवटी श्वास घेतला. वेदिकाच्या जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


वेदिका ही Spinal Muscular Atrophy Type- One या आजाराचा सामना करत होती. SMA हा आजार अतिशय दुर्धर आजार आहे. वेदिका पाच महिन्यांची असतांना तिला SMA टाईप-1, ह्या जनुकीय आजार असल्याचे समजले. हा आजार वाढत्या वयाबरोरबच शरीरातील एक - एक अवयव निकामी करत जातो. परंतु अमेरिकेमध्ये या आजारावर झोलगेन्स्मा (Zolgensma) ही लस उपलब्ध असल्याचे वेदिकाच्या पालकांना समजले.

मात्र, या लसीसाठी लागणारा खर्च हा 16 कोटी रूपये असल्याने आणि त्यानंतरही 3 ते 4 कोटी रूपये अतिरिक्त खर्च लागणार असल्याने वेदिकाच्या आई – बाबाच्या पायाखालची वाळू सरकली.

मात्र, तरी देखील तिच्या आई- बाबांनी जीवाचं रान केलं. आणि नागरिकांच्या मदतीने 77 दिवसात जवळपास दीड लाख नागरिकांनी 16 कोटी रुपयांची मदत जमवली.

15 जुनला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेदीकाला झोलगेन्स्मा इंजेक्शन यशस्वी रित्या देण्यात आलं होत. आता वेदिका पुर्णपणे बरी होईल अशी आशा तिचा आई-वडिलांना असतानाच काल वेदिकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी समजताच तिच्या आई-वडिलांसह अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांनी प्रयत्न करून देखील वेदिकाचा जीव वाचवण्यात यश न आल्याने अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

पत्रकार संतोष आंधळे यांनी देखील ट्विट करत 'वेदिका तुझ्या भरवश्यावर सगळे पालक जगत आहे. तू अशी-कशी आम्हाला सोडून गेलीस. तुला भेटायला मी पिंपीरीला येणार होतो. तुझे बाबा म्हणतात श्वास अडकला आणि ती गेली. नाही पटत मला वेदिका तू आशा होतीस तू माझी आणि सगळ्यांची. बेटा तू आहेस त्या ठिकाणी मस्त राहा, आणि आम्हाला बळ देत राहा. आम्ही करू प्रयत्न असंख्य वेदिका वाचवायचे पण तुझा आशीर्वाद आमच्यासोबत राहू दे.' असं म्हटलं आहे.

वेदिकाला मदत करणाऱ्या प्रत्येकाने अशाच भावना व्यक्त केल्या आहेत.

Tags:    

Similar News