बँक अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा नडला, 56 लाखांचा दरोडा...

Update: 2022-01-18 05:42 GMT

पेण शहरातील मुख्य रस्त्यावरील सनसिटी इमारती मध्ये असलेले स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएम वर दरोडा टाकून दरोडेखोरांनी 56 लाख रुपये लंपास करून पेण पोलिसांना आव्हान दिले आहे.

       याबाबत सविस्तर वृत्त असे की पेण शहरातील सनसिटी इमारतीमध्ये असलेले स्टेट बँक ऑफ इंडिया च्या एटीएम वर दरोडेखोरांनी दरोडा टाकून तब्बल 56 लाख 34 हजार 800 चोरून पलायन केले. दरोड्याची माहिती मिळताच पेण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाकरिता फॉरेन्सिक पथकही पाचारण करण्यात आले होते. त्याचप्रमाणे दरोडेखोरांचा मागोवा घेण्यासाठी डॉग स्कॉड कुत्र्याची मदत घेण्यात आली.

    मागील महिन्यात तरणखोप येथेही राहत्या घरात लाखो रुपयांची चोरीची घटना घडली होती. तसेच पेण शहरातील मुख्य मार्गावरील आठ दुकाने चोरांनी एका रात्रीत फोडून चोऱ्या केल्या होत्या. सदरची घटना ताजी असतानाच चक्क स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य रस्त्यावरील एटीएम दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केली. या दरोडेखोरांनी स्वतःबरोबर आणलेला गॅस कटर व सिलेंडर एटीएम मध्येच टाकून पलायन केले. पेण शहरात एका मागोमाग एक अश्या अनेक चोरीच्या घटना होत असल्याने चोरांनी व दरोडेखोरांनी पेण पोलिसांना आव्हान दिले आहे. या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

बँक अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा

   एटीएम वर पडलेल्या दरोड्या मुळे बँक अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. या एटीएम ला बँक अधिकाऱ्यांनी साधा सीसीटीव्ही कॅमेराही लावला नव्हता. तसेच रात्रीच्या वेळी एटीएम वर सुरक्षा रक्षकही नेमला नव्हता. नेमका याच गोष्टीचा दरोडेखोरांनी फायदा घेतला. कर्तव्यात कसूर करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेण शाखेतील अधिकाऱ्यांवर बँक प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.

Tags:    

Similar News