बुल्लीबाई प्रकरणातील आरोपी इंजिनीअरला १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

Update: 2022-01-04 12:31 GMT

 Bulli Bai app प्रकरणातील आरोपी विशाल कुमार याला आज, मुंबईतील वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका मुख्य संशयित आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. संबंधित महिला या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे.

इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेल्या २१ वर्षीय विशाल कुमारला Bulli Bai app प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने बेंगळुरूतून काल ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. तब्बल दहा तासांहून अधिक वेळ चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. आज त्याला पोलिसांनी वांद्रे कोर्टात हजर केले. त्याला १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Bulli Bai app द्वारे मुस्लीम समाजातील महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि त्यांची बोली लावली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर, याबाबत १ जानेवारी रोजी मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी अॅप लॉंच करणाऱ्या प्लॅटफॉर्मशी संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला आहे. त्यांच्या उत्तरानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले. Bulli Bai appमधील तीन खाती एक महिला हाताळत होती आणि तिचा साथीदार विशाल कुमार याने खालसा सुपरमॅसिस्ट या नावाने खाते उघडले होते. ३१ डिसेंबर रोजी त्याने या अकाउंटचे नाव बदलून शिखांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याचा काहीही संबंध नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags:    

Similar News