Afganistan Women: काबूल विद्यापीठात महिलांना प्रवेश बंदी...

Update: 2021-09-29 16:22 GMT

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून तिथल्या महिलांना अनेक निर्बंधांना सामोरं जावं लागत आहे. महिलांवर लादल्या जाणाऱ्या निर्बंधांची संख्या दिवसेंदिवस वाढतंच आहेत. एवढंच नव्हे तर, तालिबानने त्यांच्या शिक्षण आणि कामावर सुद्धा अनेक निर्बंध लादले आहेत. मात्र, आता तालिबानने काबूल विद्यापीठात मुलींच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.

तालिबानने पीएचडी पदवी धारक (P.hD पदवी धारक) कुलगुरूच्या जागी नवीन कुलगुरुंची नियुक्त केली आहे. मात्र, हे नवीन कुलगुरू केवळ पदवीधारक आहेत. दरम्यान, नवीन कुलगुरूंनी त्यांच्या नियुक्तीनंतर असं जाहीर केलं आहे की, जोपर्यंत विद्यापीठात इस्लामिक वातावरण निर्माण होत नाही. तोपर्यंत मुली आणि महिलांच्या प्रवेशाला विद्यापीठात बंदी असेल.

अमेरिकन न्यूज चॅनेल सीएनएनने (CNN) नवीन कुलगुरू मोहम्मद अशरफ घैरत यांच्या एका ट्विटचा हवाला देत एक वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, नवीन कुलगुरूंनी ट्विट केलं आहे की,

"इस्लामिक वातावरण तयार होईपर्यंत कोणत्याही महिलेला काबूल विद्यापीठात किंवा कामावर येण्याची परवानगी नाही."

या संदर्भात एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. 1990 च्या दशकात, जेव्हा तालिबानचं अफगाणिस्तानवर राज्य होतं, त्यावेळी स्त्रियांना सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही पुरुष नातेवाईकांशिवाय बाहेर जाण्यास सक्त मनाई होती. तसे न केल्यास महिलांना मारहाण केली जायची.

दरम्यान, तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पासून विद्यापीठांमध्ये, मुली आणि मुलांमध्ये पडदे असतील असा नियम तयार केला आहे. तर दुसरीकडे, तालिबान्यांनी पीएचडी पदवीधारक कुलगुरूंना हटवत बी. ए. पदवी असलेल्या मोहम्मद अशरफ घैरत यांना कुलगुरू बनवले आहे. मात्र, तालिबानच्या या निर्णयानंतर काबूल विद्यापीठातील सुमारे 70 शिक्षक आणि प्राध्यापकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

एकीकडे, कुलगुरू म्हणून मोहम्मद अशरफ यांच्या नियुक्तीला सोशल मीडियावर प्रचंड विरोध होत आहे. तर दुसरीकडे, तालिबानवर जोरदार टीका देखील केली जात आहे.

दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष बरहानुद्दीन रब्बानी यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाचे नाव बदलून Kabul Education Society असं केलं आहे.

Tags:    

Similar News