नवरात्र उत्सव : रंग लाल...

‘हे’ स्त्रियांचं काम नाही असं म्हणणाऱ्या समोर ‘ती’ दिपस्तंभासारखी उभा राहणारी... स्त्रियांनो रडगाणी गाऊ नका रणरागिणी व्हा... असं म्हणत 500 मुलींची बॉर्डीगार्डची पलटन तयार करणारी आजची नवदुर्गा... दीपा परब या धाडसी आणि लढवय्या स्त्रीची प्रेरणादायी कहाणी समीर गायकवाड यांनी आपल्या शब्दात मांडली आहे नक्की वाचा

Update: 2020-10-20 11:37 GMT

काहींना आजही वाटतं की अमुक काम हे स्त्रियांच्या कुवतीत बसणारं नाही. "छे हे काम बायकांना काय जमणार?" असा अनेकांचा अजूनही तोरा असतो. अशा कामांची यादी लोक आपल्या वैचारिक कुवतीप्रमाणे बनवत असतात. यातलंच एक काम बाऊन्सर्स वा बॉडीगार्ड्सचं आहे. इथं ताकद लागते, स्टॅमिना लागतो.

काहींना वाटतं की हे बायकांना कसे जमणार? मात्र, एका स्त्रीने हे करून दाखवलं, नुसतंच करून दाखवलं नाही. तर आपल्या वाटेवर चालण्यासाठी अनेकींना हात दिला आणि पाहता पाहता एक मोठा समूह निर्माण केला. आधी लोक तिच्यावर हसले. काहींनी टर उडवली, काहींनी या बायकांचा कस जोखण्यासाठी कामही दिलं. मात्र, हे काम खूपच किरकोळ होतं. जसं की कुठे एखाद्या पबबार मध्ये कुणी एक टल्ली झाली वा तिला हँगओव्हर झालं तर सांभाळून घ्यायचं. वा यापुढचा टप्पा म्हणून केवळ स्त्रियांच्या संरक्षणाची जबाबदारी द्यायची वा वयस्कर व्यक्तींच्या रक्षणाचा जिम्मा सोपवायचा. या असल्या कामांवर ती रणरागिणी खुश होणारी नव्हती.


 



तिने थोडं कठीण आणि कणखर काम मागून पाहिलं. मात्र, तिला कुणी सिरीयस घ्यायला तयार नव्हतं. मग तिनेच आपला रस्ता स्वतःच शोधायचं ठरवलं. त्यासाठी तिने मायानगरी मुंबई सोडली आणि पुण्याचा रस्ता धरला. यात तिच्या पतीची खूप मदत झाली. पुण्यात आल्यावर तिला काम मिळू लागलं, मग तिच्याकडे काम मागायला येणाऱ्या स्त्रियांचा ओघ सुरु झाला. मात्र, तिने एक गोष्ट कटाक्षाने पाळली, अत्यंत नवतरुणी असं ज्याला आपण म्हणतो तशा तरुण मुलींना तिने हे काम दिलं नाही. अशा मुलींना शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला.

तिनं बायका निवडल्या, नवऱ्याची मारझोड सहन करणाऱ्या, त्याची व्यसनं झेलणाऱ्या, कौटुंबिक अत्याचाराच्या बळी ठरलेल्या महिलांना तिने प्राधान्य दिलं. त्यांना आधी निर्भीड बनवलं, स्वतःची ताकद त्यांना दिली आणि शारीरिक व मानसिक रित्या सुदृढ होण्यास सर्वतोपरी मदत केली. यातूनच तिचा स्वतंत्र समूह उभा राहिला. रणरागिणी लेडीज बाऊन्सर अँड वुमन पॉवर ग्रुपची निर्मिती ही अशी झाली. ही कथा आहे दीपा परब या धाडसी आणि लढवय्या स्त्रीची.



दीपा परब यांचं हे वर्तमान सुखवणारं असलं तरी त्यामागं जुन्या दिवसांच्या आठवणीचे दुःखद कढ आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेली दीपा ही चार बहिणी आणि एक भाऊ या भावंडांपैकी चौथी मुलगी! साहजिकच मुलींच्या शिक्षणाकडे आई वडिलांनी दुर्लक्षच केलं. पण तरीही घरची बेताची आर्थिक परिस्थिती, कमावणारे एकटे वडील त्यामुळे दीपा जिद्दीने रद्दी विकणे, कागदाच्या पिशव्या बनविणे यासारखी विविध कामे करून घरखर्चाला हातभार लावत होती.

दीपाच्या कुटुंबावर अडचणींचा डोंगर कोसळावा तशी एक आपत्ती समोर आली ती म्हणजे दीपाचे वडील कॅन्सरने गंभीर आजारी पडले. अंथरुणाला खिळायच्या बेतात आले तेंव्हा सर्वात धाकटी असूनही मोठ्या बहिणींच्या लग्नासाठी सारसबागेत वडापाव विकून तिने पैसे उभे केले. खरं तर पोलिसात जाण्याची दीपाची खूप इच्छा होती. पण आपल्या घरच्या मुली पोलिसात काम करत नाहीत. म्हणून आईने भरलेला फॉर्म फाडून टाकला आणि दीपाची स्वप्नांवर पाणी पडले. दरम्यान दीपक सारखा तिच्या स्वप्नांना बळ देणारा मित्र तिला भेटला होता.

आता पुढे कोणते काम करायचे, काय करायचे कसे करायचे असा प्रश्न तिच्यापुढे उभा राहिला. पडेल ते काम करण्याची तयारी असणाऱ्या दीपाने विविध क्षेत्रातील वस्तूंच्या होम टू होम मार्केटिंगच्या कामात दीपाने हळूहळू जम बसवला. हे काम करताना अनेक स्त्रियांशी तिचा संपर्क येवू लागला. इतकेच नाही तर गरजू, अत्याचारित बायका तिच्याकडे मदत मागायला येऊ लागल्या.

अनेकजनींना दीपाने स्वतःच्या पायावर उभे केले. काहींना ड्रायव्हिंग शिकवून, काहींना मार्केटिंग शिकवून आणि ज्या इच्छुक होत्या आणि शरीराने तंदुरुस्त होत्या. त्यांना लेडी बाऊन्सर चे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवले. आता पावेतो दीपाकडे तब्बल डझनभर प्रकारच्या विविध मार्केटींग क्षेत्रात दीपाचा अनुभव गाठीशी आला होता. तिथे काम करत तिने जवळ जवळ 1500 स्त्रियांना काम मिळवून दिले, त्यांचे संसार उभे केले आणि त्यांना कायमचे आपलेसे केले.

मग पुढे दीपा मेकअप आर्टिस्ट म्हणून मराठी फिल्म इंडस्ट्रीत शिरली. विविध कलाकार, तंत्रज्ञ यांच्याशी संपर्क येऊ लागला आणि एक दिवस दीपाला तिच्या रफ अँड टफ पर्सनॅलिटी मुळे 'इंदू सरकार' या सिनेमात चक्क पोलिसाची भूमिका करायला मिळाली आणि तिचं पोलीस होण्याचं स्वप्न एकप्रकारे पूर्ण झालं. पण तेव्हढ्यावर दिपा कुठली स्वस्थ बसणार ?

दीपाला आता दीपकच्या रूपाने आयुष्याचा साथीदार मिळाला. दीपक चणीने लहानखुरे पण उत्तम खेळाडू आहेत. दीपक यांची स्वतःची 'पूना स्पोर्ट्स परब अकॅडमी' आहे. नेहरू स्टेडियम येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुलांनी आपापले क्रिकेट करिअर घडवले. दीपादेखील हे प्रशिक्षण घेऊन त्यांच्या बरोबर कोच म्हणून मैदानावर उतरली. रनिंग, सायकलिंग, गोळाफेक यासारख्या अनेक शारीरिक प्रशिक्षणात मुला-मुलींना तयार करण्यात दीपकना मदत करत होती. पोलीस होण्याचं तिचं स्वप्न कदाचित ती त्यांच्यात पाहत होती. पतीच्या खंबीर पाठबळाच्या जोरावर दीपाने बी.ए. पर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले .




 फिल्मी क्षेत्रात काम करताना अनेक कार्यक्रमात सुरक्षा व्यवस्थेसाठी बाऊन्सर्स लागतात हे ती पाहत होती. पण त्या क्षेत्रात कुठेही महिला दिसत नाहीत. पण योगायोगाने एकदा दीपाला अशा कामाची संधी मिळाली पण हे महिलांचे काम नाही असं म्हणून तिला डावलले गेले. स्त्रिया करू शकत नाहीत असे कोणते काम असूच शकत नाही. हा तिच्यातील आत्मविश्वास उफाळून आला. या घटनेने दीपाच्या डोक्यातील पोलिसात जाण्याच्या इच्छेने परत एकदा डोके वर काढले. पोलिसात जाता आले नाही. तरी लेडी बाऊन्सर म्हणून आपण तेच काम स्वतंत्रपणे करू शकतो. अनेक क्षेत्रातील स्त्रियांची मोठी संपर्क यादी दीपाकडे तयारच होती.

दीपाच्या या कल्पनेला तिच्याच आत्मविश्वासाने खतपाणी घातले आणि नवरा दिपक चा भक्कम पाठिंबा यातून 'रणरागिणी'ची स्थापना झाली. उत्तम शारीरिक शिक्षणातून स्वसंरक्षण आणि पोलिसांच्या मदतीसाठी समाजात शिस्त आणि संरक्षण देण्यासाठी स्त्रियांची समांतर पलटणच दीपा ने उभी केली.

आज या संस्थेत साधारण 500 रणरागिणी रजिस्टर्ड आहेत आणि दररोज सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या वाढतच आहे. 'मी एकटी काय करू शकणार असा नुसता विचार करून काहीच न करण्यापेक्षा दीपा ने छोटीशी मशाल घेऊन धावायला सुरुवात केली आणि पाहता पाहता कारवा बनता ही चला गया! आज वुमन इम्पोवरमेन्ट क्षेत्रातील 102 पुरस्कारांनी दीपाला सन्मानित केलं गेलं आहे. पंजाब पासून कर्नाटक पर्यंत अनेक स्त्रिया मदतीसाठी तिला संपर्क करतात.

आत्तापर्यंत अनेक वृत्तपत्रात, वाहिन्यांवर तिच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. रात्री अपरात्री जरी मदतीसाठी फोन वाजला तरी ही रणरागिणी लगेच निघते! स्त्रियांनो रडगाणी गाऊ नका रणरागिणी व्हा हा दीपाचा मंत्र खरेच अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे. आजच्या काळात स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खंबीर असण्याची नितांत गरज आहे, त्या दृष्टीने दीपा ही दीपस्तंभ बनून जावी !




- समीर गायकवाड

('रणरागिणी'साठी काही काम असलं तर या नंबरवर संपर्क साधता येईल - 9623018435)

Tags:    

Similar News