मातीशी तुटलेली नाळ जोडण्यासाठी मातीतल्या खेळांच्या जत्रेचं आयोजन – सुनेत्रा पवार

Update: 2022-06-05 10:21 GMT

कोरोनामुळे खंड पडल्यानंतर रविवारी ५ जुन ला बारामतीमध्ये प्रसिध्द मातीतल्या खेळांची जत्रा भरली. Environmental Forum Of India तर्फे आयोजित या स्पर्धेमध्ये मातीतल्या खेळांचा आनंद लुटण्यासाठी असंख्य बारामतीकरांनी उपस्थिती लावली होती. तंत्रज्ञानाच्या या युगात निदान एक दिवस तरी मातीशी पुन्हा नाळ जोडता यावी या करीता या स्पर्धेचं आयोजन केल्याची प्रतिक्रीया सौ. सुनेत्रा अजित पवार यांनी दिली आहे.

स्मार्टफोन्स आणि व्हिडीओ गेम्समध्ये सध्याची पिढी व्यस्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. या व्हिडीओ गेम्स मुळे आजची पिढी मैदानी तसेच मातीतले खेळ खेळणंच विसरून गेली आहे. या नव्या पिढीला भोवरा, विटी दांडू, तळ्यात मळ्यात, टायर फिरवणं, मामाचं पत्र हरवलं असे नवे खेळ पक्त पुस्तकात वाचतानाच माहिती होतात. सर्व जुन्या मातीतल्या खेळांची नव्या पिढीला माहिती व्हावी आणि कामामध्ये हरवलेल्या जुन्या पिढीला देखील मातीत जाऊन त्यांचा मनसोक्त आनंद लुटता य़ावा यासाठी Environmental Forum Of India तर्फे बारामतीत दरवर्षी जुन महिन्याच्या पहिल्या रविवारी मातीतल्या खेळांच्या जत्रेचं आयोजन केलं जातं. याही वर्षी ते केलं गेलं.

या स्पर्धेमध्ये सायकल स्पर्धा, टायर फिरवणं, भोवरा, गोट्या, विटी दांडू, तळ्यात मळ्यात, मामाचं पत्र हरवलं अशा अनेक खेळांची मांदीयाळीच होती, ज्याला जो खेळ खेळावासा वाटेल त्याने तो खेळावा. त्याचा मनमुराद आनंद लुटावा असं आवाहन आयोजकांकडून उपस्थितांना करण्यात आलं होतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या जत्रेचा मनमुराद आनंद लुटला. या आयोजनाबद्दल सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. प्रतिक्रीया देताना त्यांनी आयोजना बद्दल माहिती दिली. शिवाय कोरोनामुळे घरात कोंडलेल्या नागरीकांना या जत्रेच्या निमित्ताने मोकळा श्वास घेता आला. आजच्या तंत्रज्ञानाच्य़ा युगात आपण सगळे यंत्र बनुन राहिलो आहोत. मातीशी आपली असलेली नाळ तुटल्यात जमा आहे. त्यामुळे या जत्रेचं महत्व फार मोठं आहे. अशा जत्रांचं आयोजन राज्यभर व्हायला हवं असंही त्या म्हणाल्या.

Tags:    

Similar News