"भावाच्या लग्नानंतरच येणार" मुंबई पोलीसांच्या नोटीसला कंगनाचं उत्तर

Update: 2020-11-10 10:36 GMT

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राजद्रोहाच्या आरोपावरुन कंगनाला मुंबई पोलिसांनी समन्स बजावलं होतं. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेलला पोलिसांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजर राहायला सांगितलं होतं. पण भावाच्या लग्नाच्या गडबडीत व्यस्त आहे असं सांगत तिने मुंबईला येण्याचं टाळलं. त्यानंतर दुसऱ्यांदा पोलिसांनी कंगनाला आणि तिच्या बहिणीला समन्स बजावलं होतं. '10 नोव्हेंबर 2020 रोजी उपस्थित राहा' असे आदेश देण्यात आले होते. पण भावाच्या लग्नाचं कारण देत तिने पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचं टाळलं आहे.

आपल्या भावाच्या लग्नानंतरच आपण पोलिसांसमोर हजर राहू शकतो, असं दोघांकडून सांगण्यात आलं आहे. कंगना रणौत आणि रंगोली चंदेल यांनी कथितरित्या सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस आणि मुंबईवर केलेल्या टीकेवरून त्यांना हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. टाईम्स नाऊनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

३ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी कंगना व रंगोलीला दुसरी नोटिस पाठवली होती. पण कंगनानं या नोटिशीला उत्तर देत भावाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असल्यानं पोलिसांसमोर हजर राहू शकणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्यास सांगितलं होतं मात्र, त्यालाही नकार देत त्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत हजर राहू शकतो असं उत्तर दिलं आहे. त्यामुळं आता कंगना व रंगोली १५ नोव्हेंबरला तरी पोलीस ठाण्यात हजर राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags:    

Similar News